

दापोली : पुढारी वृत्तसेवा
दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. डिझेलच्या तीव्र तुटवड्यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आला आहे. एकेकाळी गजबजलेले हे बंदर आता ओस पडत चालले असून, समुद्रात जाणाऱ्या अनेक नौका किनाऱ्यावरच निष्क्रिय उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
डिझेलचा अनियमित पुरवठा आणि वाढते दर यामुळे मच्छीमारांना समुद्रात उतरणे परवडेनासे झाले आहे. परिणामी, निम्म्याहून अधिक नौका बंद पडल्या आहेत. यामुळे शेकडो मच्छीमार कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रोजंदारीवर चालणाऱ्या या व्यवसायात अचानक आलेल्या खंडामुळे आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे. मासेमारी ठप्प झाल्याचा परिणाम केवळ मच्छीमारांपुरता मर्यादित नसून, मासळी विक्रेते, वाहतूकदार, बर्फ कारखाने आणि संबंधित लघुउद्योगांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे.
स्थानिक बाजारपेठेत मासळीचा तुटवडा जाणवत असून मासळीच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. यापूर्वीच समुद्रातील मासळीचे प्रमाण घटल्याने 'मत्स्य दुष्काळ' जाणवत असताना इंधन तुटवड्याने परिस्थिती अधिक बिकट केली आहे. अनेक मच्छीमारांनी कर्ज घेऊन नौका उभारल्या असून, सध्याच्या अडचणींमुळे कर्जफेड करणेही अवघड बनले आहे.
दरम्यान, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून हर्णे बंदरात नियमित डिझेल पुरवठा सुरू करावा, इंधन दर नियंत्रणात आणावेत आणि मच्छीमारांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी मच्छीमारांकडून होत आहे, अन्यथा येत्या काळात मासेमारी उद्योग कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.