

Devrukh Political News
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी ग्रामपंचायती मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मांगणी माजी खासदार विनायक राऊत यांनी लेखी निवेदना द्वारे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे केली. याबरोबर या ग्रामपंचायतीतील सात पैकी चार सदस्यानी तडकाफडकी राजीनामे दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार जि, प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तांबेडी ग्रामपंचायत कार्यालयाची चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन येथील स्थानिक ग्रामस्थ अजिंक्य ब्रीद यांनी वारंवार या ग्रामपंचायत कार्यालयाकडे केली.त्याची दखल न घेतल्याने माजी खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधले.दरम्यान, विकासकामासंदर्भात माहिती मागवली. कधी तोंडी तर कधी माहितीच्या कायद्या अंतर्गत मात्र प्रत्येक वेळी दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली.
या विषयी देवरुखचे गट विकास अधिकारी यांनी कोणतीच दखल न घेतल्याने अजिंक्य ब्रीद यांनी खासदार यांच्याकडे सर्व पुराव्या निशी तोंडी तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेत खासदार राऊत यांनी आपल्या पत्रात प्रत्यक्षात कामे न करता कामाची रक्कम काढल्याचे दिसत असल्याने या अपहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करून तसा अहवाल आपणास मिळावा अशी मांगणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
नुकतीच तांबेडी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा घेण्यात आली. त्यावेळी सरपंच ग्रामसेवक यांनी विकासकामे न करताच पैसे काढल्याचे कबूल केले होते. त्यावेळी तांबेडी ग्रामपंचायत कार्यालयाची सखोल चौकशी करण्याचा ठराव ग्रामस्थानी एक मतांनी मंजूर केला होता.कार्यालयाची चौकशी करण्याचा ठराव पारित होताच तांबेडी ग्रामपंचायतीच्या सात सदस्यापैकी चार सदस्यांनी तात्काळ राजीनामे दिले. हे सारे प्रकरण आपल्या अंगाशी येऊ नये म्हणून तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ. रिया राजेंद्र ब्रीद, सुप्रिया सुरेश सुतार, सुषमा अशोक तांबे, अजय सदानंद ब्रीद या चौघानी राजीनामा दिला आहे.
तांबेडी ग्रामपंचायत कार्यालयातील चौघा सदस्यांनी राजीनामा दिल्याचे परिसरात कळताच खळबळ माजली असून आता खासदारांच्या पत्राची तरी प्रशासन दखल घेते का ,हे येत्या काही दिवसांतच कळून येणार आहे.