

चिपळूण : ग्रामस्थांकडून वर्गणी गोळा करून तालुक्यातील निवळी येथे एक वृक्षप्रेमी श्री पावणाई देवी मंदिर (बाराआणे) देवस्थानच्या तीन एकर जागेमध्ये देवराई निर्माण करीत आहे. गेली दोन वर्षे त्यांची मेहनत सुरू असून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक व वृक्षप्रेमी गुलाब सुर्वे स्वतः मेहनत करून ही देवस्थानची देवराई निर्माण करीत आहेत.
कोकणात पुरातन देवराया अस्तित्त्वात होत्या. कोकणामध्ये प्रत्येक गावाची ग्रामदेवता वेगळी आहे. या ग्रामदेवतेला कौल लावूनच गावातील कोणतेही काम सुरू होते. या ग्रामदेवतांची गावामध्ये काही एक जागा आहे. त्या जागेत देवराया उभ्या राहिल्या होत्या. मात्र, अलिकडच्या काळात या देवराया नामशेष होत आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही मोजक्याच ठिकाणी पुरातन देवराया अस्तित्त्वात आहेत.
ग्रामदेवतांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याच्या उद्देशाने अनेक गावोगावी नवीन मंदिरे बांधण्यात आली. मात्र, मधल्या काळात ही मंदिरे उतरल्या छप्पराची होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाची गरज होती. हे लाकूड देवरायांमधील झाडे तोडून मंदिर बांधकामासाठी वापरण्यात आले. त्यामध्ये अनेक देवराया उजाड झाल्या. त्यामुळे आज देवराया नव्याने निर्माण करणे काळाची गरज बनली आहे. हे लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांपासून निवळी येथील गुलाब सुर्वे यांनी गावात पुरातन देवराई नव्याने निर्माण करण्याचा जणू ध्यास घेतला आहे. त्यासाठी सुरुवातीला निवळी बाराआणे ग्रामस्थांची बैठक ग्रामदेवतेच्या मंदिरात घेण्यात आली.
चिपळूण येथील व्यावसायिक शाहनवाज शाह यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. ग्रामस्थांबरोबर दोनवेळा त्यांनी बैठका घेतल्या. देवस्थानच्या जमिनीमध्ये देवराई निर्माण करण्यासाठी त्यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आणि येथील लोक तयारदेखील झाले. ‘आम्ही झाडे जगवू असा त्यांनी निर्धार केला. त्याचवेळी शाहनवाज शाह’ यांनी सामाजिक वनीकरण व नाम फाऊंडेशनच्या वन संजीवन योजनेच्या माध्यमातून निवळी येथील देवराई उभारण्यासाठी पुढाकार घेतला. या ठिकाणी पुणे येथून वेगवेगळ्या प्रकारची 1 हजार 200 झाडे आणण्यात आली. येथील निसर्गात वाढणारी, दुर्मीळ झालेली झाडे गतवर्षी पावसाळ्यात लावण्यात आली. आज ही झाडे एक वर्षाची झाली आहेत.
झाडे जगविण्यासाठी येथील ग्रामस्थ व वृक्षप्रेमी गुलाब सुर्वे यांची मेहनत फळाला येत आहे. 1,200 झाडांपैकी 50 झाडे वर्षभराच्या कालावधीत मेली आहेत. उर्वरित झाडांची वाढ झाली आहे. अर्धा फूट उंचीची असलेली झाडे आता तीन ते चार फूट उंच झाली आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात ती आणखी वाढणार आहेत. वर्षभर गुलाब सुर्वे यांनी काही सहकार्यांना बरोबर घेत झाडे जगविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पावसाळ्यात गवत काढणे, उन्हाळ्याच्या दिवसांत झाडांना पाणी देणे. या शिवाय वणवा येऊ नये म्हणून बाजूचे गवत कापणे अशी अनेक कामे करून घेतली. ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याला मोठे पाठबळ दिले.
उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी टंचाई असताना टँकर मागवून देवराई जगली पाहिजे या हेतूने पाण्याची व्यवस्था करण्यात आली आणि आज त्यांची देवराई एक वर्षाची होत आहे. मेलेली झाडे ते पुन्हा यावर्षी लावणार आहेत. मजूर करून या देवराईची देखभाल केली जात आहे. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून देवराई उभी करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी गुलाब सुर्वे यांचे योगदान मोठे आहे.
तुम्ही झाडे द्या, लावलेली झाडे जगविण्याची जबाबदारी असा निर्धार निवळी ग्रामस्थांनी गाव बैठकीत घेतल आणि विशेष म्हणजे तब्बल वर्षभरानंतर लावलेली झाडे त्यांनी जगविली आहेत. हे वैशिष्ट्य आहे. दरवर्षी अनेक झाडे लावली जातात. वृक्षारोपण सोहळे होतात आणि पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात पुन्हा नव्याने झाड लावले जाते, असे उदाहरण असताना निवळी ग्रामस्थांचा आदर्श घेण्यासारखा आहे. देवराई उभी करण्यासाठी त्यांनी वर्गणी गोळा केली आणि झाडे लावली. नाम फाऊंडेशनने झाडे आणि खड्डे मारून दिले तर वर्षभराची झाडाची काळजी वर्गणीतून काढलेल्या पैशातून घेण्यात आली. त्यासाठी गुलाब सुर्वे हे ग्रामदेवीचे भक्त पुढे सरसावले. त्यामुळे ही देवराई आकार घेत आहे.