रत्नागिरी :तीन जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीलाच अमली पदार्थ विक्रीसाठी ताब्यात बाळगून असताना पोलिसांनी पकडले. शहरातील सरकारी पॉलिटेक्निकच्या मागील बाजूस सुमारे 1 लाख 22 हजार रुपये किमतीचा 2 किलो 29 ग्रॅम गांजासद़ृश अमली पदार्थ विक्रीसाठी ताब्यात बाळगून असताना शहर पोलिसांनी त्याच्यावर ही कारवाई बुधवार, 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.10 वाजता केली.
फैसल मकसूद म्हसकर (रा. कर्ला जामा मशिदीजवळ, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. फैसल म्हसकरला उपविभागीय दंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) (अ) अन्वये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, व कोल्हापूर जिल्ह्यांतून 2 वर्षांसाठी हद्दपार केले होते. हद्दपारीची कारवाई केली असतानाही आरोपी फैसल म्हसकरने रत्नागिरीत येऊन सरकारी पॉलिटेक्निक इमारतीच्या मागील बाजूस गांजा विकताना आढळून आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि रत्नागिरी शहर पोलिसांनी केली. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल शांताराम झोरे यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार संशयित फैसल म्हसकर हा बुधवारी सायंकाळी थिबा पॅलेस येथील सरकारी पॉलिटेक्निकच्या मागील रस्त्यावर विक्रीसाठी आपल्या ताब्यात 1 लाख 21 हजार 740 रुपयांचा गांजा बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 10 हजारांचा एक मोबाईलही हस्तगत करण्यात आला. त्याच्याविरोधात एन. डी. पी. एस. अॅक्ट 1985 चे कलम 8(क),20 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.