

रत्नागिरी ः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी विभागाने काजू लागवडीसाठी धडक कार्यक्रम तातडीने हाती घ्यावा, पुढील दोन वर्षात सध्याच्या लागवडीपेक्षा चारपट लागवड होईल, असे उद्दिष्ट ठेवले पाहिजे, तसेच कोचीन येथे असलेल्या काजू व कोको संचलनालयाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी- सिंधुदुर्ग असावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्याची सूचना दापोली येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली.
कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशनने ( सी. सी. आय. एफ.) या संस्थेच्या पुढाकाराने काजू उत्पादक प्रक्रियादारांच्या समस्या समजावून घेऊन अभ्यासपूर्ण अहवाल शासनाला सादर करण्यासाठी दापोली येथे झालेल्या मंथन बैठकीत कोकणातील काजू उत्पादकांची सद्यस्थिती आणि दीर्घकालीत उपाययोजना यावर चर्चा झाली. यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ.पराग हळदणकर ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप हळदवणेकर, काजू प्रक्रिया आणि मूल्य साखळी सल्लागार विवेक अत्रे, काजू प्रक्रिया क्लस्टर ज्येष्ठ उद्योजक जयवंत तथा दादा विचारे, काजू फेडरेशनचे धनंजय यादव यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीत कार्डियन करेक्ट संस्थेचे रवींद्र अमृतकर आणि सहकार भारतीचे शैलेश दरगुडे सहभागी झाले होते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर व पालघर या जिल्ह्यांमध्ये काजूचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. कोकणात रोजगार वाढीसाठी बंद असलेल्या छोट्या-मोठ्या क्षमतेचे काजू प्रक्रिया युनिट्स पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक आहेत. काजू प्रक्रिया करणार्या लघु उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत धोरण निश्चितीसाठी बैठक घ्यावी. सहकारी शेतकरी उत्पादक संस्था आणि विविध कार्यकारी सोसायटी यांना बळकटी देऊन त्यांच्या समस्यांवर तोडगा काढता येईल, असे मत शैलेश दरगुडे यांनी मांडले.
काजू उत्पादकांशी दैनंदिन संपर्कात असलेले अतुल काळसेकर केदार साठे यांनी या समस्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करावा, असे सर्वानुमते ठरल्याचे सांगितले. कोकणातील शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाने विदर्भ, मराठवाड्याला दिलेला पोकरा, स्मार्ट मॅग्नेट योजनेच्या धर्तीवर कोकणातील शेती क्षेत्राच्या विकासासाठी मूलभूत सुविधा विकसित होण्यासाठी योजना जाहीर करावी. काजू बोंडापासून सरबत सीरप तसेच वाईन तयार करण्याचे तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केले आहे.
कोकण कृषी विद्यापीठाने कृषी हवामान विभागणीय काजू पिकासाठी अभ्यास केला आहे. त्यातील निरीक्षणानुसार काजूची कोकणातील पारंपरिक लागवड प्रामुख्याने बांधावर तसेच ओसाड जमिनीवर बी लावून केली जाते. जुनी लागवड ही बियांपासून तयार केलेल्या रोपांची आहे, 1990 नंतर रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड या योजनेखाली जातीवंत काजू कलमांची मोठ्या प्रमाणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लागवड झाली. बहुतांश लागवड वेंगुर्ला चार वेंगुर्ला सात वेंगुरला आठ या सुधारित जातींच्या कलमांपासून केलेली आहे. यापैकी जास्तीत जास्त वेंगुर्ला चार या जातीची लागवड आहे. विद्यापीठात काजू लागवड व उत्पादनाबाबत अनेक महत्त्वपूर्ण शिफारशी केले असून त्याचा वापर करावा, असे विद्यापीठातून सूचित करण्यात आले आहे.