Ratnagiri News : इंग्रजी माध्यमाच्या ओढीने जि.प. शाळांतील विद्यार्थी घटले!

पाच वर्षांत १७,६३४ विद्यार्थ्यांची घट; शाळांची संख्याही १३१ ने कमी, पाच वर्षांत विद्यार्थी संख्येत २४ टक्‍के घट
Ratnagiri News
इंग्रजी माध्यमाच्या ओढीने जि.प. शाळांतील विद्यार्थी घटले!
Published on
Updated on

जाकीरहुसेन पिरजादे

रत्नागिरी : कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या सातत्याने आणि झपाट्याने घटत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल १७ हजार ६३४ विद्यार्थ्यांची घट झाली आहे. सन २०२१-२२ मध्ये जि.प. शाळांमध्ये ७३ हजार २३१ विद्यार्थी होते. ही संख्या २०२५-२६ मध्ये घटून ५५ हजार ५९७ वर आली आहे. १३१ शाळेची संख्या कमी झाल आहे. खासगी शाळांचे वाढते जाळे, आधुनिक सुविधा आणि पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढता कल हे त्यामागील महत्त्वाचे कारण मानले जात आहे. त्‍यामुळे जिल्‍हा परिषद शाळांसमोर पटसंख्या टिकवण्याचे मोठे आव्‍हान आहे.

रत्‍नागिरी जिल्‍हा परिषदेत सध्या २ हजार ३६३ शाळा असून ५५ हजार ५९७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्‍ध व्‍हावी, या दृष्टीने जिल्‍हा परिषदेने शाळा सुरू केल्‍या होत्‍या. मात्र पालक खासगी शाळेकडे आकर्षित होत आहेत. जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामीण भागात शिक्षण विभागातर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. उत्तम शिक्षकही आहेत, त्‍यानंतरही पालकांकडून खासगी शाळांनाच पसंती दिली जात असल्‍यामुळे शाळांची परिस्‍थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.

पटसंख्यांअभावी शाळा बंद होण्याचे प्रमाही वाढत आहे. शाळा संख्याबरोबर आता पटही दरवर्षी कमी होत चालला आहे. दरम्यान, याच कालावधीत शाळांची संख्याही २ हजार ४९४ वरून २ हजार ३६३ वर आली आहे. म्हणजेच १३१ शाळा कमी झाल्या आहेत. ग्रामीण भागातील पालकांचा आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याकडे वाढता कल, खासगी शाळांमधील सुविधा आणि बदलती शैक्षणिक अपेक्षा यामुळे जि. प. शाळांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्‍या घटत्‍या संख्येवर बोलताना जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमध्ये अजूनही इयत्ता पहिलीच्‍या वर्गात प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थी संख्येत वाढ होण्याची शक्‍यता असल्‍याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

शिक्षण विभागाने दिलेल्‍या आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात २ हजार ४९४ जिल्‍हा परिषद शाळा होत्या व त्यात ७३,२३१ विद्यार्थी शिक्षण घेत होते. २०२२-२३ मध्ये विद्यार्थी संख्या ६८,५७०, २०२३-२४ मध्ये ६३ हजार ९१०, २०२४-२५ मध्ये ६० हजार १२३ तर २०२५-२६ मध्ये ती आणखी घटून ५५ हजार ५९७ वर झाली आहे. म्हणजेच पाच वर्षांत विद्यार्थी संख्येत सुमारे २४ टक्क्यांनी घट झाल्‍याचे दिसन येत आहे.

पट वाढीसाठी शाळेतील सुविधा वाढवणे गरजेचे

जिल्‍हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आधुनिक भौतिक सुविधा, डिजिटल शिक्षण, इंग्रजी संभाषण कौशल्य, क्रीडा व विविध उपक्रम उपलब्ध करून देण्याची गरज आहे. स्‍वच्‍छतागृह, पिण्याचे पाणी, आकर्षक वर्गखोल्‍या, शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्‍हा परिषद शाळांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शाळांची गुणवत्ता आणि सुविधांमध्ये सुधारणा झाल्यास पालकांचा सरकारी शाळांकडे पुन्हा कल वाढण्यास मदत होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news