

दापोली : दापोली सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी गुप्त माहितीनुसार केलेल्या कारवाईत सुमारे 4 किलो 833 ग्रॅम ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त केली असून, चारजणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 17 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
सीमा शुल्क विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका मारुती वॅगनआर गाडीचा पाठलाग करून ती एस.टी. स्टँड, दापोलीजवळ अडवण्यात आली. या वाहनातून ‘अंबरग्रीस’ म्हणून ओळखली जाणारी पांढर्या-तपकिरी रंगाची वस्तू मिळाली. या कारवाईत सुमारे 4 किलो 833 ग्रॅम अंबरग्रीस जप्त करण्यात आली असून, वाहनासह चारजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई सीमाशुल्क अधीक्षक अतुल व्ही. पोतदार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्या पथकात निरीक्षक प्रतीक अहलावत निरीक्षक, रमणीक सिंग,मुख्य हवालदार सुहास विलंकर, करण मेहता, प्रशांत खोब्रागडे, गौरव मौर्य, हेमंत वासनिक सचिन गावडे यांचा समावेश होता. जप्त केलेले अँबरग्रीस आणि आरोपींना वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. ही कारवाई वन्यजीव संरक्षण विभाग व महाराष्ट्र वन खात्याकडे पुढील तपासासाठी सोपविण्यात आली आहे.