

दापोली : ‘पुडी’ आणि अन्य सांकेतिक नावाने दापोली शहरात आणि तालुक्यातील ग्रामीण भागात दुकान, टपर्या आदी ठिकाणी विकल्या जाणार्या गुटख्याचे दापोली हे माहेरघर बनतेय की काय? अशी भीती आता व्यक्त करण्यात येत आहे.
या गुटख्याबरोबर गांजा आणि अन्य नशिले पदार्थदेखील दापोली शहरात अगदी राजरोस विकले जात असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. त्यामुळे भारतरत्नांच्या पर्यटन तालुक्याला गालबोट लागत असल्याची सर्व समान्याची भावना आहेे. दापोली शहरात रोज लाखोंचा गुटखा राजरोस येत आहे. याचे एजंटदेखील आहेत. या एजंटमार्फत दापोली शहरात आणि ग्रामीण भागात तो सप्लाय होत आहे. मात्र या गुटख्या विक्रीबाबत संबंधित यंत्रणेची धाडसी कारवाई अनेक वर्षे दिसून आली नाही. त्यामुळे या नशेच्या अधीन सर्रास तरुणवर्ग गेल्याचे दिसत आहे. दापोलीत ग्रामीण भागातून युवक वर्ग मोठ्या प्रमाणात कॉलेज आणि कामानिमित्त येत आहेत. त्यात अन्य राज्यातील परप्रांतीय मजुरांची भर पडली आहे. त्यात परप्रांतीय तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यात असंख्य तरुणांना या गुटख्याची लत लागलेली दिसत आहे. त्यामुळे अगदी सहज मिळणारा गुटखा हा तरुणांच्या तोंडात दिसत आहे. आणि त्याच्या रंगीबेरंगी पिचकार्या रस्त्यावर दिसत आहेत.
या गुटख्याच्या विक्रीबरोबर गांजाही विकला जात आहे. याबाबत या आधी दापोली पोलिसांनी दापोली शहरात भर वस्तीत गांज्याची विक्री करणार्यावर कारवाई केली आहे, तर नुकतीच काही दिवसांपूर्वी देखील पोलिसांनी अशीच कारवाई केली आहे. मात्र तरीही या अमली पदार्थाची विक्री होत आहे असे नागरिक बोलत आहेत. त्यामुळे या कारवाईत काही दम नसल्याचे शहरातील नागरिकांमधून बोलले जात आहे. त्यामुळे हे अमली पदार्थ आणि गुटखा विक्री रोखण्याबाबत शासकीय यंत्रणेचा कोणताही वचक राहिलेला नाही, अशीही चर्चा जागरुक नागरिकांतून होताना दिसत आहे.
रहदारीच्या ठिकाणी सिगारेट ओढू नका, असे कायदा सांगत आहे. सिगारेटच्या सेवनाने आणि त्याच्या धुराने कर्करोगास आमंत्रण मिळते असे. मात्र असे असतानाही दापोली शहरात भरवस्तीत सिगारेटचा धूर मोठ्याप्रमाणात निघत आहे. एसटी स्टॅण्ड गल्लीत तरुण पिढी या सिगारेटच्या आहारी गेलेली दिसत आहे. मात्र याबाबत तक्रारी करुन आणि सांगूनही यंत्रणा मात्र जागी होताना दिसत नाही.