.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
दापोली : ‘नारळी पुनवंला, गोमू देऊ या नारळ...’ अशा एकापेक्षा एक पारंपरिक कोळीगीतांच्या ठेक्यावर ताल धरत बुधवारी दापोलीत पाजपंढरीतील कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमाचा सण साजरा केला. रत्नागिरीतही पोलिस तसेच सीमा शुल्क खात्याकडून समुद्राला नारळ अर्पण करीत नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली.
दापोलीत पाजपंढरी किनारी वेळी कोळी बांधवांनी पारंपरिक पेहराव केला होता. समुद्र शांत होण्यासाठी या वेळी सोनेरूपी नारळ दर्याला अर्पण करण्यात आला. यावेळी कोळी बांधवांनी मिरवणूकही काढली. पाजपंढरीत बुधवारी कोळी संस्कृतीचे दर्शन या निमित्ताने अनेकांना पहायला मिळाले. दरवर्षी मासेमारीला समुद्रात जाण्याआधी नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी कोळी मच्छीमार बांधवांकडून सागराची विधिवत पूजा केली जाते. यात समुद्राला शांत करण्यासाठी नारळ अर्पण केला जातो. ही अनेक वर्षांपासूनची पाजपंढरी गावाची परंपरा आहे.
काळ बदलला तरी कोळी बांधवांनी ही परंपरा आजही त्याच श्रद्धेने जोपासली आहे. यावेळी कोळी बांधव बोटींची पूजा करतात. बोटीना पताका लावतात छान रंगरंगोटी करून नौका सजवून मासेमारीसाठी समुद्रात लोटतात. पाजपंढरी गावातील कोळी बांधवांनी या वेळी नारळी पौर्णिमा उत्सवात चांगलीच रंगत आणली. रत्नागिरीच्या मांडली किनार्यावर सोमवारी सायंकाळी सीमा शुल्क खाते तसेच पोलिस दलाकडून समुद्र देवतेला नारळ अर्पण करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील पाजपंढरी हे सर्वात जास्त मच्छीमार लोकवस्तीचे गाव आहे. पाजपंढरी गावात नारळी पौर्णिमेच्या दिवशी कमरेला रुमाल बांधलेली पुरुष मंडळी तर नऊवारी साड्या नेसलेल्या, सोन्याच्या दागदागिन्यांनी मढलेल्या कोळी भगिनी कोळीगीताच्या तालावर फेर धरताना पहायला मिळाल्या.