Ratnagiri News : हर्णे बंदरातील ‌‘दमाणी‌’ दमानेच!

हंगाम उशिरा सुरू झाल्याने वाटेकरी मच्छीमारांची कमाई घटली
Ratnagiri News
हंगाम उशिरा सुरू झाल्याने वाटेकरी मच्छीमारांची कमाई घटली
Published on
Updated on

प्रवीण शिंदे

दापोली : प्रमुख मासेमारी बंदर असलेल्या हर्णे येथे यंदा नवीन मासेमारी हंगामातील ‌‘दमाणी‌’ अपेक्षेप्रमाणे न झाल्याने मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मासेमारी हंगाम उशिराने सुरू होणे आणि त्यानंतरही मासळीची अपेक्षित आवक न होणे यामुळे यंदा बोटमालकांसह तांडेल आणि खलाशांच्या कमाईवर परिणाम होणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात ठराविक कालावधीसाठी मासेमारी व्यवसाय बंद ठेवण्यात येतो. यंदा शासनाकडून मासेमारी व्यवसाय सुरू करण्यास १५ ऑगस्टपासून परवानगी मिळाल्याने हंगाम तब्बल पंधरा दिवस उशिराने सुरू झाला. त्यामुळे गणपतीपूर्वीच्या कालावधीत मासेमारीसाठी मिळणारे दिवस कमी झाले.

मागील वर्षी याच कालावधीत मासेमारीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मोठ्या प्रमाणात मासळी जाळ्यात सापडल्याने वाटेकरी मच्छीमारांना चांगली दमाणी मिळाली होती. यंदा मात्र हंगाम उशिरा सुरू झाल्यानंतरही मासळीची अपेक्षित आवक झालेली नसल्याने परिस्थिती वेगळी आहे. पंधरा दिवसांचा कालावधी कमी मिळणे आणि मासेमारीत अपेक्षित यश न मिळणे, यामुळे यंदाची दमाणी नाखवा, तांडेल आणि खलाशांना अपेक्षेइतकी मिळणार नसल्याचे चित्र आहे.

मच्छीमार कुटुंबांसाठी गणपती उत्सवासह अन्य खर्चासाठी हंगामाच्या सुरुवातीला मिळणारी दमाणी महत्त्वाची असते. मात्र, यंदा अपेक्षित कमाई न झाल्याने गणपतीपूर्वी मच्छीमार कुटुंबांचा आर्थिक ताळमेळ बिघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरवर्षी दमाणी मिळाल्यानंतर गणपतीपूर्वी मच्छीमारांकडून होणारी खरेदी स्थानिक बाजारपेठेला चालना देते. मात्र, यंदा हर्णेतील मासेमारी मंदावल्याचा परिणाम मच्छीमारांपुरता मर्यादित नसून स्थानिक बाजारपेठेवरही होण्याची शक्यता आहे.

‘दमाणी‌’ म्हणजे काय?

मासेमारीमध्ये हंगामाच्या सुरुवातीपासून गणपती आगमनापर्यंत बोटीचा मालक नाखवा, बोटीचा कारभारी तांडेल आणि बोटीवर काम करणारे खलाशी हे सर्वजण मासेमारीतून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये वाटेकरी पद्धतीने सहभागी होतात. या पद्धतीने उत्पन्नाच्या वाट्याला स्थानिक भाषेत ‌‘दमाणी‌’ असे म्हटले जाते. हंगाम सुरू झाल्यापासून गणपती विराजमान होईपर्यंत मासेमारी व्यवसायातून होणारे उत्पन्न आणि त्यातील वाटा संबंधितांमध्ये ठरावीक भागीदारीनुसार विभागला जातो. त्यानंतर मात्र मासेमारी व्यवसायाची पद्धत बदलून हंगाम संपेपर्यंत खपिल पद्धतीने कामगारांना पगार दिला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news