

दापोली : परदेशी भाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टर्निप’ची यशस्वी शेती प्रथमच दापोलीत करण्यात आली असून, उद्यान विद्या महाविद्यालय, दापोली येथील विद्यार्थ्यांनी हा प्रयोग प्रत्यक्ष शेतात उतरून यशस्वी करून दाखवला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमातून हा उपक्रम साकारला असून, त्यामुळे कोकणात एक्झॉटिक भाज्यांच्या लागवडीसाठी नवा मार्ग खुला झाला आहे.
महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी प्रक्षेत्रावर टर्निपची लागवड करून यशस्वी उत्पादन घेतले असून, सध्या ही भाजी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. टर्निपबरोबरच नवलखवल, झुकिनी, कोबी, फुलकोबी, मधुमका, टोमॅटो, वांगी, मिरची, दुधी भोपळा, गवार, कलिंगड, काकडी, पडवळ, शिराळं, घोसाळ, घेवडा व भेंडी अशा विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे. यापैकी काही भाज्यांनी आधीच बाजारपेठेत प्रवेश केला असून, उर्वरित पिके लवकरच ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहेत. स्थानिक ग्राहकांना ताज्या, दर्जेदार आणि वेगळ्या चवीच्या भाज्या उपलब्ध करून देण्यासोबतच शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे पर्याय निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
नर्सरी क्रमांक 10 येथे इच्छुक नागरिकांना प्रत्यक्ष शेती पाहण्याची तसेच त्याच ठिकाणी ताजी भाजी खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दापोली परिसरात एक्झॉटिक भाज्यांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची शक्यता असून, भाजीपाला उत्पादनाला आर्थिकदृष्ट्या नवी दिशा मिळेल, असा कृषी क्षेत्रातील जाणकारांचा विश्वास आहे. श्री. सैतवाल आणि डॉ. शिगवण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळाला.