

दापोली : दापोली तालुक्यात नुकतीच पसरलेली समाधानकारक थंडी शेतकरी आणि बागायतदारांसाठी आनंदाची ठरली आहे. आंबा आणि काजू बागायतदार आता मोहरधारणेच्या उत्सुकतेने भरून आले आहेत. या थंडीत झाडांना विश्रांती मिळते आणि फुलांचे प्रारंभिक टप्पे सुरळीत पार पडण्याची शक्यता वाढते.
स्थानीय बागायतदार अरविंद मांडवकर गाव रुखी हे म्हणाले, या वर्षी थंडी वेळेवर पसरली. आमच्या आंबा व काजूच्या झाडांना योग्य वातावरण मिळाले आहे. काही दिवस अशीच थंडी राहिली तर मोहरधारणा निश्चितच चांगली होईल. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दापोलीसह रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत किमान तापमान सध्या आठ ते नऊ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. या थंडीत झाडे पुन्हा फुलायला सज्ज होतात आणि योग्य वेळेत मोहर येण्याची शक्यता वाढते. थंडी मोहरधारणेस पोषक आहे, मात्र तापमानात अचानक बदल किंवा अति थंडी फळ पिकांना नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.