

दापोली : नगर येथील मूळ गावी सुट्टीसाठी गेलेल्या दापोलीतील एका कुटुंबावर परतीच्या प्रवासात काळाने घाला घातला. मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथे शनिवारी झालेल्या भीषण अपघातात आई आणि मुलीचा मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले असून मुलगा किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कार्यरत असलेले अनिल मरकड हे पत्नी आणि दोन मुलांसह नगर येथील मूळ गावी गेले होते. सुट्टी आटोपून ते दापोलीकडे परतत असताना पोलादपूर येथील हॉटेल बालाजी परिसरात त्यांच्या इर्टिगा कारची समोरील कंटेनरला जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला.
या अपघातात अनिल मरकड यांच्या पत्नी सुवर्णा गव्हाणे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांची मुलगी अनुश्री हिनेही प्राण गमावले आहेत. अनिल मरकड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाच वर्षीय मुलगा चिन्मय याला किरकोळ दुखापत झाली आहे.
सुवर्णा गव्हाणे या स्टेट बँक ऑफ इंडिया, दापोली शाखेत वरिष्ठ सहयोगी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या अकाली निधनामुळे बँकिंग क्षेत्रासह दापोली परिसरात शोककळा पसरली आहे. मरकड कुटुंब जालगाव येथील मंगलभूमी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असून दुर्घटनेची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. आनंदाने सुरू झालेला परतीचा प्रवास एका क्षणात दुःखद ठरला. एका अपघाताने कुटुंबातील दोन जीव हिरावल्याने दापोली तालुक्यासह विद्यापीठ परिसरावर शोककळा पसरली आहे.
सुट्टीचा आनंद संपला, आयुष्यभराचे दुःख मागे ठेवून...
नगर येथील मूळ गावी काही दिवस आनंदात घालवल्यानंतर मरकड कुटुंब दापोलीकडे परत निघाले होते. मात्र पोलादपूर येथे नियतीने वेगळाच निर्णय घेतला. एका क्षणात आई-मुलीचा मृत्यू झाला, तर कुटुंबप्रमुख गंभीर जखमी झाले. सुखरूप घरी पोहोचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या कुटुंबाचा प्रवास कायमचा अधूरा राहिला. या दुर्घटनेमुळे दापोलीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.