

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथे गॅस वाहू टँकरची प्रवासी बसला धडक लागून झालेल्या अपघातात 31 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही. गॅसची गळती आणखी मोठ्या प्रमाणात वाढली असती किंवा स्फोट झाला असता तर या अपघाताची भीषणता वाढली असती. सद्यस्थितीत मुंबई-गोवा व गुहागर-विजापूर मार्गावर 24 तास धोकादायक गॅस व रसायनांची वाहतूक राजरोस सुरू आहे. या संदर्भात नियमांची अंमलबजावणी होते का? हे पाहणे आवश्यक आहे. अन्यथा हे वाहन धोकादायक बॉम्ब ठरण्याची शक्यता आहे.
कोकण मुंबईलगत असल्याने या महामार्गालगत अनेक औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहेत. यामध्ये रसायनी, खालापूर, माणगाव, पेण, नागोठणे, महाड, लोटे असा हा औद्योगिक पट्टा आहे. यातील बहुतांश एमआयडीसीमध्ये रासायनिक उद्योग आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबई ते गोवा दरम्यान वेगवेगळ्या प्रकारची रसायने आणि गॅसची 24 तास वाहतूक सुरू असते. अनेकदा या घातक रसायनवाहू टँकरचा अपघात होतो आणि महामार्गावर गॅस गळती होऊन किंवा रसायन सांडून महामार्ग ठप्प होतो. लोटे औद्योगिक वसाहत ही केमिकल झोन म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग व गुहागर विजापूर मार्गावरून अनेक रसायने, गॅस टँकर यांची वाहतूक दिवस रात्र सुरू असते. त्यामुळे महामार्गावरून धावणारी ही वाहने अनेकदा धोकादायक ठरतात.
रसायन किंवा गॅसची वाहतूक करताना अपघात होऊ नये म्हणून अनेक नियम बनविण्यात आले आहेत. मात्र, ते कागदावरच आहेत की काय असा सवाल उपस्थित होतो. धोकादायक वस्तू वाहतूक कायद्यानुसार रसायने आणि गॅसची वाहतूक करताना विशेष नियम पाळले जातात. यात रसायनांची वर्गीकरण, लेबलिंग आणि वाहतुकीच्या नियमांचा समावेश होतो. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रसायने आणि गॅसच्या वाहतुकीमुळे होणार्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यात हवेतील प्रदूषण, पाण्याचे प्रदूषण आणि जमिनीचे प्रदूषण यांचा समावेश होतो. महामार्गावर रसायन आणि गॅसची वाहतूक करताना वर नमूद केलेल्या कायदेशीर नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, परिवहन खाते, पोलिस यांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे व अशी वाहने प्रत्येक चेक पोस्टवर तपासणी करून? ? थोडा वेळ थांबवून तसेच ट्रॅफिक जाममध्ये या वाहनांना रस्त्याच्या बाजूला काढून थांबून ठेवणे आवश्यक आहे. घाटात गर्दी नसेल अशाच वेळी ही गॅस, रसायनांची वाहने सोडली जाणे अपेक्षित आहे, म्हणजे भविष्यात होणारे धोकादायक अपघात टळतील.