

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेची दामले शाळा ही महाराष्ट्रातील एकमेव शाळा आहे की, तिच्या पहिलीच्या वर्गाची पटसंख्या 186 आहे. दहावीपर्यंत या शाळेमध्ये 1 हजार 470 विद्यार्थी शिकत आहेत. म्हणजे सरासरी एका वर्गामध्ये 140 विद्यार्थी शिकत आहेत. पालकांचा शिक्षकांवर व व्यवस्थापनावर असलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. दामले विद्यालयाची नवीन इमारत वर्षभरात उभी राहिल ही इमारत सर्वांत देखणी इमारत असेल. केजरीवालांच्या दिल्ली पॅटर्नपेक्षा महाराष्ट्रात यापुढे दामले पॅटर्न राबवला जाईल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
दामले शाळेमध्ये सोमवारी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. मुलांचे रंगवलेले पहिले पाऊल कागदावर उमटवून पालकमंत्री सामंत यांनी त्यांचे शाळेमध्ये स्वागत केले. या अनोख्या कार्यक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले. त्यानंतर आयोजित शाळा प्रवेशोत्सव 2025-26 कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी कासार, प्रशासन अधिकारी मुरकुटे, मुख्याधिकारी वैभव गारवे, मुख्याध्यापक भगवान मोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, रत्नागिरी तालुकाप्रमुख बाबु म्हाप, माजी महिला व बालकल्याण समिती सभापती शिल्पा सुर्वे, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते.
ना. सामंत म्हणाले, दामले शाळा ही पालिकेची पहिली शाळा आहे जिथे प्रवेश मिळविण्यासाठी पालकांना रांगा लावाव्या लागतात. एक वर्षांमध्ये दामले विद्यालयाची इमारत उभी राहणार आहे. ही इमारत उभी राहिल, तेव्हा पालिकेची सर्वांत देखणी इमारत असेल. पाच वर्षांपूर्वी मंत्री झालो तेव्हा सांगितले होते. एक दिवस असा येईल रत्नागिरी शहर महाराष्ट्रातील सर्वांत सुंदर शहर असेल आणि शैक्षणिक हब होईल. आता एवढी शैक्षणिक दालने उघडली आहेत की, विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची गरज नाही. रत्नागिरीत शासकीय मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मरिन इंजिनिअरीग कॉलेज आहे. पुढच्या वर्षभरात पहिली ओशन युनिव्हर्सिटी आपल्याकडे होईल. ज्याला बी. फार्मसी, संस्कृत विद्यापीठ, वारकर्यांचा वारसा जपायचा असले तर संत वाड्मय शिकायला कवि कालिदासांचे संस्कृत विद्यापीठ स्थापन केले आहे, कौशल्य विकास आहे. भविष्यात परदेशात शिक्षणासाठी जायचे असले तर वर्षभरात विमानतळ सुरु होतय. रत्नागिरी आता शैक्षणिक हब तयार झाले आहे.
काहींनी अनेक शंका उपस्थित केल्या परंतु आम्हाला रत्नागिरीचा विकास साधायचा आहे. विकासाची संकल्पना आपण व्हॉटसअॅपवर मांडतो, पण आपल्या आमदाराने काय केले हे पाहण्याची गरज आहे. चांगले तारांगण, भगवती किल्ल्यावर शिवाजी महाराजांची शिवसृष्टी, अरबी समुद्रात छत्रपतींचे स्मारक झालले. पण मी असा आमदार आहे की अरबी समुद्राच्या बाजुला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झाले आहे. संभाजी महाराजांचे स्मारक देखील झाले. रत्नागिरीचे बारामती झाले पाहिजे, असे अनेकांचे म्हणणे होते. परंतु दोन महिन्यांपूर्वी बारामतीचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरीत येऊन रत्नागिरी पाहुण गेले एवढी ताकद आता रत्नागिरीत आहे. नासामध्ये जाण्याचा देशात पहिला उपक्रम रत्नागिरीने राबवला. पालकांना भेटतो तेव्हा, माझा मुलगा, मुलगी अमेरिकेला जाते, हे स्वप्न तुमच्यामुळे पूर्ण झाले, असे आशीर्वाद अनेकांनी दिले. यातच समाधान आहे, असे सामंत म्हणाले.