खेड : दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना व भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये सुरू झालेला वाद पूर्ण संपुष्टात आला आहे. मतदारसंघात महायुती बळकट व्हावी म्हणून दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठक स्वतः उमेदवार आ. योगेश कदम यांनी पुढाकार घेऊन दापोलीत घेतल्यानंतर भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्ते योगेश कदम यांचा प्रचार करतील, असे जाहीर केले आहे. त्यामुळे योगेश कदम यांच्यासाठी हा शुभसंकेत मानला जात आहे.
राज्यात महायुती असतानाही दापोली मतदार संघात भाजप व शिवसेना नेतेमंडळी एकमेकांवर रोष ठेवून होती. विद्यमान आमदार योगेश कदम यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी स्वतः सेना - भाजपमधील दरी भरून काढण्यासाठी पुढाकार घेतला. दोन्ही पक्षांमध्ये समज-गैरसमज वाढत गेले. दोन्ही पक्षांच्या युतीमध्ये पडलेले अंतर स्पष्ट जाणवत होते. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते गोंधळले होते. मात्र, महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार योगेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळीही भाजपचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप ही शिवसेना पक्षाबरोबर नसल्याचे वारंवार दिसून येत होते. या पार्श्वभूमीवर दापोलीमध्ये महायुतीचे उमेदवार कदम यांच्या पुढाकाराने दापोली विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकार्यांसोबत बैठक बोलावली.(Maharashtra assembly poll)
या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, दापोली तालुकाध्यक्ष संजय सावंत, शहराध्यक्ष संदीप केळकर, खेड तालुका अध्यक्ष ऋषीकेश मोरे, जिल्हा सरचिटणीस भाऊ इदाते, मंडणगड तालुकाध्यक्ष बावा लोखंडे, लवू साळुंवे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आ. योगेश कदम यांनी दोन्ही पक्ष हे राज्यामध्ये सत्तेत असून दोन्हीही पक्ष एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे कोणतेही मतभेद नको, आपल्याला महायुतीची सत्ता आणायची असून झाले गेले ते विसरून जावे, असे सांगत महायुतीतील तणाव निवळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर भाजपकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. ही प्राथमिक चर्चा यशस्वीपणे झाल्यानंतर चिपळूण येथे महायुतीचे जिल्ह्यातील प्रमुख नेते ना. उदय सामंत, ना. रवींद्र चव्हाण, आ. योगेश कदम, बाबाजी जाधव यांच्यासह ज्येष्ठ भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.
यावेळी भाजप नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे कार्यकर्ते यांना जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू करण्याच्या सूचना केल्या. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दापोलीमधील युतीमधील वाद हा गैरसमजातून झाला असून आ. योगेश कदम यांना निवडून आणण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील, असे जाहीर केले. दापोली मतदारसंघात महायुती भक्कम झाल्याचे चित्र आहे. या मतदारसंघात भाजपची मते निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे गत निवडणुकीच्या तुलनेने आ. योगेश कदम यांच्यासाठी युतीतील मनोमीलन हा शुभसंकेत आहे.