

खोपोली : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील नवीन बोगद्यात शनिवारी दुपारी एक विचित्र अपघातांची मालिकाच घडली. ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली. यामध्ये किमान 25 ते 30 वाहनांचा चुराडा झाला आहे. या अपघातात एक महिला ठार झाली आहे, तर जवळपास 50 जण जखमी आहेत. जखमींमध्ये लहान मुले, महिला, वृद्धांचा समावेश आहे.
एक्स्प्रेस वे वरून कंटेनर मुंबईकडे जात असताना 41 कि.मी. खोपोली हद्दीतील नवीन बोगद्यात कंटेनरचा ब्रेक निकामी झाला आणि कंटेनरने समोरील वाहनांना धडक दिल्यानंतर ठोकर देण्याची मालिका जवळपास 5 किलोमीटरपर्यंत सुरू होती. या अपघातात अनेक वाहनांचा चक्काचूर झाला असून, बसमधील 15 ते 20 गंभीर जखमी झाले आहेत. इतर वाहनांमधील प्रवासीही जखमी झाले. अनिता वेरवंडे (वय 35) ही महिला जागीच ठार झाली आहे.
जखमींना एमजीएम तसेच खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. गंभीर जखमींना एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी खोपोली पोलिस, खालापूर पोलिस, हेल्फ फाऊंडेशन टीमने मदतकार्य करीत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
या अपघातामुळे दुपारनंतर मुंबई - पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. पोलिसांनी मोठ्या कौशल्याने अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करत वाहतूक पूर्ववत सुरु केली.
दरम्यान, जखमींमध्ये गौरी फरांदे वय 50 , रेश्मा फरांदे वय 51, अंजली फरांदे वय 23, सुजाता फरांदे वय 48, मीरा क्षीरसागर वय 40, प्रभावती पवार वय 45, जयश्री गुंड वय 45, सुमन गुंड वय 60, कमल सुलोक वय 20, छबा म्हात्रे वय 60, केसरबाई गुरव वय 41, रवींद्र जिरमिरे वय 24, रुतजा फरांदे वय 30, निलिमा बोरावले वय 34, प्रतिभा जिरमिरे वय 29, प्रिती फरांदे वय 29, प्रज्वल फरांदे वय 20आदींचा समावेश आहे.