

वैभव पवार
गणपतीपुळे : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील श्रीक्षेत्र गणपतीपुळेच्या स्वयंभू श्री लंबोदरच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा अशा कालावधीत सायंकाळी नित्यनेमाने होणार्या दीपोत्सवाची सांगता बुधवारी कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आली.
या दिवशी श्रींचा गाभारा, मुख्य मंदिर तसेच मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्गावरील ‘मोरया’ या ठिकाणचे त्रिपूर यांची विधिवत पूजाअर्चा होऊन असंख्य तेल वातीच्या दिव्यांनी, पणत्यांनी, समयांनी सर्व परिसर प्रकाशमय करण्यात आला. यादिवशी सायंकाळी सात ते साडेसात यावेळेत भक्तिमय, तेजोमय वातावरणात श्रींची सामूहिक आरती, मंत्रपुष्पांजली प्रार्थना अशा स्वरूपाचा विलोभनीय आणि उत्साहवर्धक कार्यक्रम झाला.
यासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळे मंदिर ट्रस्टने याचे उत्तम नियोजन केले होते. यामध्ये असंख्य भक्तगण, ग्रामस्थ, पर्यटक मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने सहभागी झाले. या भक्तिमय सोहळ्याची साक्ष होण्यासाठी गणपतीपुळे गावातील स्थानिक ग्रामस्थ व भक्तगण पारंपरिक वेशभूषेमध्ये हजर राहिले होते. त्यामुळे या कार्यक्रमाची शोभा खर्याअर्थाने वाढली. तसेच हा कार्यक्रम सर्वच भाविक व पर्यटकांसाठी विशेष लक्षवेधी ठरला, अशी माहिती संस्थान श्री देव श्रीक्षेत्र गणपतीपुळेचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी दिली.