

रत्नागिरी ः तालुक्यातील निवळी-शिंदेवाडी येथील परिसरात साफसफाई करत असताना दोन दिवसांपूर्वी तुटून पडलेल्या विजेच्या प्रवाहित तारेला चिकटून दोघांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 17 जुलै रोजी सायंकाळी 5 वा. सुमारास उघडकीस आली. या दुर्घटनेने सार्या गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई देण्याबाबत आश्वस्त करण्यात आले आहे.
चंद्रकांत यशवंत तांबे (वय 40) आणि मृदुला वासुदेव वाडकर (60, दोन्ही रा. निवळी, रत्नागिरी) अशी प्रवाहित विद्युत तारेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हे दोन बळी गेले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून महावितरणच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवळी ग्रामपंचायतीचे सदस्य संजय निवळकर यांनी केली आहे. या दुर्घटनेनंतर गावकरी प्रचंड संतापले होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले होते.
यातील वाडकर कुटुंबियांच्या घराशेजारील महावितरणची प्रवाहित तार दोन दिवसांपूर्वी तुटून पडलेली होती. या बाबत त्यांनी महावितरणकडे तक्रार दिली होती. परंतु त्यांच्या तक्रारीची महावितरणने दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे तुटलेल्या तारेचा विद्युत प्रवाह सुरुच राहिला. दरम्यान, गुरुवारी दुपारी चंद्रकांत यशवंत तांबे आणि मृदुला वासुदेव वाडकर त्याच ठिकाणी झाडे-झुडपे तोडून साफसफाई करत असातना त्यांना या विद्युत तारेचा स्पर्श होऊन त्यांना आपला प्राण गमवावा लागला. सायंकाळी 5 वा. सुमारास गावातील एक महिला त्याठिकाणाहून जात असताना तिला ही दोघही विद्युतभारित तारेला स्पर्श होऊन पडलेली आढळून आली. त्यांना विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच त्या महिलेने आरडा-ओरडा केल्यानंतर आजुबाजूचे गावकरी घटनास्थळी धावून आले. समोरील दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला होता. या सर्व प्रकारामुळे निवळी येथील ग्रामस्थ संतापले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामीण पोलिसांनी अधिकची कुमक मागवून घेतली होती.