

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा
प्रो लीग 11 वी कबड्डी स्पर्धा 18 तारखेपासून सुरुवात होत असून या स्पर्धेतील पटणा पायरेटस् संघाच्या कर्णधारपदी चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील शुभम शिंदे यांची निवड झाली आहे. या निवडीने चिपळूणचे नाव उंचावले आहे. याबद्दल शुभम शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चिपळूण शहरासह ग्रामीण भागात कबड्डी खेळाला फार मोठे महत्त्व आहे. राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने स्पर्धा आयोजित केल्या जातात. यातून नवोदित खेळाडू तयार होत असल्याचे आपल्याला वेळोवेळी पहावयास मिळाले आहे. विशेष म्हणजे प्रो प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धेमध्ये या खेळाडूंना आपला खेळ दाखविण्याची संधी मिळाली आहे. आता तर प्रो कबड्डी 11 पर्वाच्या स्पर्धेत चिपळूण-कोळकेवाडीतील शुभम शिंदे यांची पटणा पायरेटस् संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
शुभम शिंदे याने सन 2017 पासून जुनिअर नॅशनल खेळायला सुरुवात केली. त्यानंतर सलग तीन वर्ष नॅशनल स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवली. यामुळेच सिनियर नॅशनल स्पर्धेत सन 2020, 2022, 2024 मध्ये खेळून कबड्डी स्पर्धेत आपले अस्तित्व सिद्ध केले. तत्पूर्वी स्थानिक वाघजाई कोळकेवाडी संघाकडून खेळतांना कबड्डी खेळाला सुरुवात केली. स्थानिक स्पर्धांमध्ये देखील शुभम शिंदे यांनी क्रीडा रसिकांची वाहवा मिळवल्याचे पहावयास मिळाले आहे. सध्या सेंट्रल रेल्वे मध्ये तिकीट तपासणीस म्हणून नोकरीलाला आहे. दोन वेळा इंडियन कॅम्प मध्ये सिलेक्शन झाले. प्रो कबड्डी मध्ये त्याने पुणेरी पलटण संघातून खेळायला सुरुवात केली व दोन वर्ष त्याचं संघाकडून खेळला नंतर पटणा पायरेटस् संघाकडून नंतर दोन वर्ष बंगाल वॉरियर्स संघाकडून व आता परत पटणा पायरेटस् संघाकडून खेळताना शुभम शिंदे यांची कर्णधार म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल शुभम शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रो कबड्डी स्पर्धेतील पटणा पायरेटस् संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याबद्दल शुभम शिंदे यांच्या वडिलांनी प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला. शुभमला लहानपणासूनच कबड्डी खेळाची आवड आहे. तसेच दुसरा चिरंजीव आदित्य याला देखील आवड असल्याने या दोघांनाही आम्ही आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले. यामुळे आता दोघे कबड्डी या क्षेत्रात नाव कमावून आहेत. शुभमचा भाऊ आदित्य याने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे कर्णधारपद भूषवताना 67 वर्षानंतर प्रथमच अजिंक्यपद मिळवून दिले होते. आता शुभम व आदित्य हे वाघजाई कोळकेवाडी संघाचे प्रतिनिधित्व करीत असताना जिल्ह्यातील व पुणे मुंबई या ठिकाणी या संघाने अजिंक्यपदावर आपले नाव कोरून संघाचा दबदबा कायम ठेवला आहे. प्रो-कबड्डीमध्ये एका मोठ्या संघाचे कर्णधारपद शुभमला मिळाल्याने आमचा आनंद आणखीनच द्विगुणीत झाल्याचे शुभमचे वडील शशिकांत शिंदे म्हणाले.