

चिपळूण : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भविष्यात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन चिपळूण नगरपरिषदेने शहरातील पाणीपुरवठ्यावर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार पाणीपुरवठ्याच्या वेळेत आणि कालावधीत बदल करण्यात आला असून, २३ नोव्हेंबरपासून नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी होणार आहे. शहरातील पाच विभागांसाठी स्वतंत्र वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. बहुतांश भागांत दिवसातून एकदाच, तर काही भागांत गरजेनुसार दोनवेळा पाणीपुरवठा केला जाणार आहे.
वाशिष्ठी आणि शिव नदीच्या काठावर वसलेल्या चिपळूण शहरात साधारणपणे पाण्याची टंचाई जाणवत नाही. राज्यातील अन्य भागांच्या तुलनेत शहराला मुबलक पाणी उपलब्ध होत असते. मात्र, गोवळकोट खाडी परिसरातील साठवण टाकीत भरतीचे पाणी घेतले गेल्याने काही भागांत मचूळ पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण होते. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शासनाच्या निर्णयानुसार पाणी वापरावर निर्बंध आले आहेत. भविष्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी नगरपरिषदेने आतापासूनच पाणी बचतीचे नियोजन केले आहे.
यापूर्वी शहरात दिवसातून दोनवेळा सुमारे एक ते दीड तास पाणीपुरवठा होत होता. नव्या नियोजनानुसार बहुतांश ठिकाणी एकाच वेळेत दीड तास पाणी दिले जाणार आहे. काही भागांत मात्र स्थानिक गरज आणि वितरण व्यवस्थेनुसार सकाळी व दुपारी दोनवेळा पाणीपुरवठा कायम ठेवण्यात आला आहे.
नगरपरिषदेने खेर्डी-माळेवाडी, उपनगर पंप हाऊस, पाग, खेंड आणि कांगणेवाडी या पाच साठवण टाक्यांमधून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. खेर्डी-माळेवाडी टाकीअंतर्गत शंकरवाडी, मुरादपूर, साईबाबा मंदिर परिसरात सकाळी ५.३० ते ७.३०, वडार कॉलनी-बाळकृष्णनगर येथे ७.३० ते ९ आणि काविळतळी ते वांगडे मोहल्ला परिसरात ९ ते १०.३० या वेळेत पाणीपुरवठा होणार आहे.
उपनगर पंप हाऊस टाकीअंतर्गत रावतळे, विंध्यवासिनी, परांजपे स्कीम, बेबल कॉलनी आणि शिवाजीनगर परिसरात सकाळी ६ ते ७.३०, ओझरवाडी येथे ७.३० ते ९, तर बुरुमतळी येथे ९ ते १०.३० या वेळेत पाणी दिले जाणार आहे. पागझरी आणि आपटे गल्ली परिसरात सकाळी १०.३० ते १२, तर पागझरीच्या वरच्या भागात दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत पाणीपुरवठा होईल. पाग टाकीअंतर्गत सुकाई मंदिर, गोपाळकृष्णवाडी, पाग जोशीआळी आणि पागमळा परिसरात सकाळी ६ ते ७ आणि दुपारी २ ते २.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
कास्कर मोहल्ला, रानडे आळी आणि गोरिवलेवाडी परिसरात सकाळी ७ ते ८ आणि दुपारी २.३० ते ३ या वेळेत पाणीपुरवठा होईल. मिरगलवाडी आणि सागर प्रेस परिसरात सकाळी ६.३० ते ८ या वेळेत पाणी दिले जाणार आहे. खेंड टाकीअंतर्गत बाजारपेठ, भेंडीनाका, उक्ताड नाका, खेंड गणपती मंदिर, वाणीआळी, भोगाळे आदी भागांत सकाळी ६ ते ७.३०, मार्कंडी परिसरात ७.३० ते ९, तर अभिषेक हॉटेल रोड, प्रभात रोड आणि मिठागरी मोहल्ला परिसरात ९ ते १०.३० या वेळेत पाणी दिले जाणार आहे. परकार चाळ परिसरात सकाळी ७ ते ८.३०, तर हॉटेल शालोम आणि मार्कंडी विटलाईनगर परिसरात ५.३० ते ७.३० ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.
कांगणेवाडी टाकीअंतर्गत बावशेवाडी, पागमळा आणि बायपास महालक्ष्मीनगर परिसरात सकाळी ६.३० ते ७.३० आणि दुपारी ३ ते ३.३०, भाटकर मोहल्ला, उक्ताडचा वरचा भाग आणि कांगणेवाडी वरचा भाग येथे सकाळी ७.३० ते ८.३० आणि दुपारी २ ते २.३० या वेळेत पाणीपुरवठा होणार आहे. कांगणेवाडी खालचा भाग आणि बडदेवाडी परिसरासाठीही स्वतंत्र वेळ निश्चित केली आहे. नव्या वेळापत्रकामुळे नागरिकांनी आपल्या परिसरातील पाणीपुरवठ्याची वेळ लक्षात घेऊन पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.