

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी 7ः30 पासून मतदानाला प्रारंभ होणार आहे. 28 नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत असून 42 हजार 582 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून शहरातील 48 मतदान केंद्रांवर मतपेट्या रवाना झाल्या आहेत.
चिपळूण न.प.च्या मतदानासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे. शहरातील विविध 26 ठिकाणी 48 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत.
चिपळूणमध्ये एकही संवेदनशिल मतदान केंद्र नसून शहरातील बांदल हायस्कूल येथील केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून, तर महाराष्ट्र हायस्कूलमध्ये सखी केंद्र तयार केले आहे. मतदान यंत्रणा सुरळीत पार पाडण्यासाठी 531 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. शहरातील 42 हजार 582 मतदार मतदान करणार असून यामध्ये 21 हजार 596 महिला व 20 हजार 986 पुरुष मतदार आहेत.
26 नगरसेवक पदासाठी 110 तर नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. महायुती किंवा महाविकास आघाडी नसल्याने येथे मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. प्रचार अंतीम टप्प्यात आला असून सोमवारी (दि.1) सायंकाळी प्रभागा-प्रभागात प्रचार रॅली काढण्यात आल्या. दुसरीकडे मतदान प्रक्रिया शांततेत होण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
त्यासाठी 106 पोलिस कर्मचारी, 48 होमगार्ड, पोलिस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय भरारी पथके तैनात आहेत. मतदारांनी शांततेत व खुल्या वातावरणात मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी केले आहे.
मतदानाच्या दिवशी वाहतुकीत बदल
चिपळूण न.प.च्या निवडणुकीचा निकाल दि. 3 डिसेंबर रोजी जारी होणार आहे. मतमोजणी युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरूदक्षिणा सभागृहात होणार आहे. यासाठी चिपळुणातील चिंचनाका ते बहादूरशेख चौक हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी 7 वा. पासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत येथील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार आहे. नागरिकांनी मुंबई-गोवा महामार्गाचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या मार्गावर पोलिस बंदोबस्त असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस कार्यरत आहेत.