

चिपळूण : पोफळी येथील कोयना जलविद्युत केंद्राला 25 वर्षांनंतर प्रथमच महानिर्मिती कंपनी अंतर्गत विद्युत केंद्राच्या नाट्य स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. चिपळुणातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात 19 ते 23 जानेवारीपर्यंत या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी नाशिक, चंद्रपूर, परळी, भुसावळ, कोराडी, उरण, मुंबई, खापरखेडा आदी भागातील स्पर्धक चिपळूणला येणार आहेत.
महानिर्मिती कंपनी अंतर्गत विद्युत केंद्राची ही स्पर्धा दरवर्षी राज्याच्या वेगवेगळ्या भागात घेतली जाते. मात्र यावर्षी ही स्पर्धा भरवण्याचा मान पोफळी येथील कोयना जलविद्युत केंद्राला मिळाला आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कोयना संकुलचे अधिकारी व कर्मचारी कामाला लागले आहेत. या स्पर्धेची माहिती देताना कोयना जल विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता आणि नाट्य स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष संजय चोपडे म्हणाले, महानिर्मिती कंपनीचे अध्यक्ष राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते 19 जानेवारीला सकाळी 9 वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी महानिर्मिती कंपनीचे संचालक विश्वास पाठक, संजय मरूडकर, अभय हरणे, मनेष वाघीरकर, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, राजेश पाटील, नितीन वाघ, नितीन चांदुरकर व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजुरकर उपस्थित राहणार आहेत. या नाट्य राज्यस्तरीय स्पर्धेत दररोज दोन नाटके सादर होणार आहेत.
19 रोजी सकाळी साडेदहा वाजता कोयना जलविद्युत केंद्राचे ‘कार्टी नं. वन’ व सायंकाळी 5.30 वाजता पारस औष्णिक वीज केंद्राचे ‘बातमीची गोष्ट’, 20 रोजी सकाळी दहा वाजता चंद्रपूर औष्णिक केंद्राचे ‘दी अनॉनिमस, सांयकाळी साडेपाच वाजता भुसावळ औष्णिक केंद्राचे ‘धुमस’, 21 रोजी सकाळी 10 वा. नाशिक औष्णिक केंद्राचे ‘बदाम सात’, सायंकाळी साडेपाच वाजता परळी औष्णिक केंद्राचे ‘अजूनही उजाडत नाही’, 22 रोजी सकाळी 10 वाजता कोराडी औष्णिक वीज केंद्राचे ‘द रेन इन द डार्क, सायंकाळी 5.30 वा. उरण औष्णिक वीज केंद्राचे ‘रंगसावल्या’, 23 रोजी सकाळी 9 वा. मुंबई सांघिक कार्यालयाचे ‘बाजीराव’, सायंकाळी 4 वा. खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचे ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ ही नाटके सादर होणार आहेत.
तसेच 23 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता पारितोषिक वितरण होणार आहे. या नाटकांचा आस्वाद चिपळुणातील नाट्यरसिकांनी घ्यावा, असे आवाहन पोफळी कोयना जलविद्युत केंद्राचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी केले आहे.