

चिपळूण : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनने येथील सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी गेल्या दोन-तीन वर्षात मोठे काम केले आहे. अध्यक्ष दशरथ दाभोळकर व त्यांचे सहकारी सातत्याने मेहनत घेत आहेत. येथील स्टेडियमच्या कामासाठी आपण सर्व सर्वतोपरी सहकार्य करू, आवश्यक तो निधी देऊ, अशी ग्वाही खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित आमदार चषक सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी खासदार सुनिल तटकरे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. मी क्रिकेट खेळत आलो. कॉलेज जीवनात सिझनवर क्रिकेट खेळलो, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. यामुळे संघटन कौशल्य आणि अन्य गुण मला मिळाले, अशी कबुलीही खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
यावेळी त्यांच्यासोबत आमदार शेखर निकम, रणजीपटू धीरज जाधव, सचिन कोळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय बिरवटकर, जयंद्रथ खताते, जिल्हा बँक संचालिका दिशा दाभोळकर, पूनम भोजने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, सीमा चाळके, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, सचिव राजेश सुतार, सुयोग चव्हाण, समालोचक प्रशांत आदवडे यांसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी असोसिएशनच्या वतीने खासदार सुनिल तटकरे यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धेसाठी मेहनत घेणार्या भाऊ देवरुखकर, रणजीपटू धीरज जाधव यांचाही असोसिएशनच्यावतीने खा. तटकरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. चिपळूण सायकल क्लबमधील विक्रमवीर सायकलपटूंचाही यावेळी सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन शाहीद खेरटकर यांनी केले.