

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील फरशीनाका परिसरात मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. वाहनाला बाजू काढण्याच्या प्रयत्नात भरधाव कारने समोरून येणाऱ्या एसटी बसला धडक दिली. या अपघातात कार चालक जखमी झाला असून कारसह एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात गणेश गोपिनाथ राणे हे कार चालक जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बोरिवली ते कणकवली या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसचे चालक शिवराम सुधाकर राणे (रा. कणकवली) हे होते. एसटी बस फरशीनाका येथील पुलाजवळून जात असताना कार चालकाने पुढील वाहनाला बाजू काढण्यासाठी अचानक भरधाव वेगात कार वळवली. यावेळी नियंत्रण सुटल्याने कार थेट एसटी बसवर आदळली. अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी कार चालकाला रुग्णालयात हलविण्यात आले असून घटनेची नोंद घेण्यात आली आहे. चिपळूण पोलिस तपास करीत आहेत.