

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा
सातबारा उताऱ्यावर नावनॉंदणी करण्यासाठी लाच मागणाऱ्या सावर्डे येथील मंडळ अधिकाऱ्याला अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सातबारावर नाव लावतो असे सांगून पाच हजार रुपये मागणाऱ्या या लाचखोर महसूल अधिकाऱ्याला अखेर बेड्या पडल्या असून महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
सावर्डे येथील मंडळ अधिकारी अनिल जाधव यांच्यावर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. सावर्डे तलाठी कार्यालयात बुधवारी दुपारी लाच स्वीकारताना हा मंडळ अधिकारी रंगेहाथ सापडला. सावर्डेमधील एका तक्रारदाराने जमीन खरेदी केली होती. खरेदीखतानंतर या जमिनीची नोंद सातबारावर करावी म्हणून संबंधित व्यक्ती सातत्याने मंडळ अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारत होती.
दोन वर्षे झाली तरी संबंधित मंडळ अधिकारी दाद देत नव्हता. अखेर या विरोधात त्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. तक्रारीची खातरजमा होताच त्यादृष्टीने सापळा रचला. तक्रारदाराने पाच हजार रुपये देतो, अशी कबुली दिली.
छत्रीमध्ये सापडले पैसे...
लाचलुचपत विभागाने महसूल विभागातील मंडळ अधिकाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर ताब्यात घेतले आहे. याचवेळी याठिकाणी एका छत्रीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पोलिस कारवाई करीत आहेत. संबंधित मंडळ अधिकाऱ्याची आता अधिक चौकशी होणार असून आर्थिक तपासणीदेखील होणार आहे.