Chiplun crime : प्रेयसीच्या पैशासाठी घरमालकाचा खून

चिपळूण तालुक्यातील रामपूर येथील सांगाड्याचा अखेर उलगडा
Chiplun crime News
मयत एजाज कुरेशी
Published on
Updated on

चिपळूण : रामपूर येथे जळक्या अवस्थेत सापडलेल्या सांगाड्याचा उलगडा झाला असून, चिपळूण पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत हा खून उघडकीस आणला आहे. यामध्ये मुंबई-मालाड येथील एजाज हुसेन कुरेशी (वय 54) या व्यक्तीचा खून झाल्याचे उघड झाले आहे. प्रेयसीच्या पैशाच्या वादातून तिचा मित्र असलेल्या रामपूर येथील विशाल विजय खोडदेकर (28) याने केलेल्या मारहाणीतून त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर खोडदेकर यानेच रामपूर येथे मृतदेह आणून जाळल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पेालिसांनी खोडदेकर व त्याच्या मैत्रिणीला अटक केली आहे.

याबाबत येथील पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पत्रकार परिषदेद्वारे हे प्रकरण उलगडून सांगितले. 28 मार्च रोजी सकाळी 11 वा. रामपूर येथील डॉ. मनोज रावराणे यांनी यासंदर्भात प्रथम चिपळूण पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या रामपूर आवटेवाडी येथील बागेमध्ये एका दरीमधील झुडपात काहीतरी जाळल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या ठिकाणी असणारा कामगार प्रदीप निकम व अन्य तीन कामगारांनी ही माहिती डॉ. रावराणे यांना सांगितली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मेंगडे आपल्या फौजफाट्यासह या ठिकाणी पोहोचले. त्यांना त्या ठिकाणी छोट्या आकाराची जळलेली हाडे सापडली. याशिवाय अंगठी, एक रिंग, रॉड अशा वस्तू मिळाल्या. मोबाईल फॉरेन्सिक पथक मागवून या घटनेबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलिस अधीक्षक श्री. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले यांना माहिती देण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनाने तपासाची चक्रे फिरली.

याबाबत कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना जळकी हाडे प्राथमिक तपासासाठी दाखविण्यात आली. यावेळी त्यांच्याकडून ही हाडे मानवाची असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला व त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

जागा मालकावरच संशय

रामपूर आवटेवाडी येथील ही जागा जमीन मालक विशाल विजय खोडदेकर व अन्य लोकांच्या मालकीची होती. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपासाची सूत्रे हलविली. विशाल खोडदेकर हा गेले अनेक दिवस फरार असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. माहिती घेताना विशाल याच्या शोधात मालाड पोलिस नोव्हेंबरमध्ये चिपळूण पोलिस ठाण्यात आले होते. त्यामुळे या घटनेबाबत विशालचा संबंध असावा असा संशय बळावला व मुंबई येथे पोलिसांनी संपर्क साधून विशालच्या प्रकरणाचा शोध सुरू झाला. तो मालाड येथे असल्याची खबर मिळताच पोलिसांनी विशाल याला 31 मार्च रोजी रात्री मालाड येथून ताब्यात घेतले.

लोखंडी रॉड ठरला खुनाचा पुरावा

एजाज कुरेशी यांना एक अपघात झाला होता. त्यामुळे ते लंगडत चालत असत. त्यांच्या पायात शस्त्रक्रिया करून रॉड टाकण्यात आला होता. रामपूर आवटेवाडी याठिकाणी जळालेली हाडे सापडली. त्याचठिकाणी दोन लोखंडी रॉडदेखील सापडले होते. हे रॉड पोलिसांनी येथील अस्थिरोग तज्ज्ञांना दाखविले. त्यावेळी हे रॉड मानवी शरीरात शस्त्रक्रिया करून टाकले जातात असे निष्पन्न झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news