

चिपळूण शहर : चिपळूण शहर परिसराला रविवारी (दि.२०) दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. सोबत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट घेऊन आलेल्या वादळीवारे पावसाने शहरातील काही इमारतींच्या शेडवरील पत्रे उडाले तर सततच्या जोरदार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कडाडणाऱ्या विजेमुळे व ढगांच्या गडगडाटामुळे मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली होती. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या तर या पावसामुळे मोठ्या नुकसानीची आकडेवारी सायंकाळी उशिरापर्यंत मिळू शकली नाही. रविवारी दुपारी आलेल्या जोरदार पावसामुळे चिपळुणात दाणादाण उडाली. (Chiplun Rain)
गेले महिनाभर चिपळूण शहर परिसराला सततच्या पावसाने झोडपून काढण्याचे काम सुरू ठेवले आहे. गेले पंधरा दिवस दुपारनंतर सुरू होणारा पाऊस बाजारपेठेतील ग्राहकांची वर्दळ कमी करीत आहे. परिणामी ऐन सण- उत्सवाच्या काळात व्यापाऱ्यांना पावसामुळे मोठा फटका बसत आहे. त्यातच वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आज दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही इमारतीच्या शेडचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या. वादळाबरोबरच ढगांचा गडगडाट आणि कानठळ्या बसविणारा विजांचा कडकडाट होत होता. माणात पाणी साचत आहे. (Chiplun Rain)