Chiplun Accident : पिंपळी बुद्रुक येथे दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

दुसरा दुचाकीस्वार जखमी; अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chiplun Accident : पिंपळी बुद्रुक येथे दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

चिपळूण : तालुक्यातील पिंपळी बुद्रुक येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अशोक कृष्णा राणे (वय ५६, रा. कोळकेवाडी, जोशीवाडी) यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ७) सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुसरा दुचाकीस्वार संजय श्रीकांत पवार (वय ४०, रा. नांदीवसे, गणेशपुरवाडी, ता. चिपळूण) हा देखील जखमी झाला आहे. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक राणे हे त्यांच्या मालकीची मोटारसायकल घेऊन कोळकेवाडी येथून शिरगाव येथे पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरून ते घरी परतत असताना पिंपळी बुद्रुक येथे शिरगावहून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या एचएफ डीलक्स मोटारसायकलने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. संजय पवार हा आपल्या ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगाने आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवत असल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या धडकेत अशोक राणे हे दुचाकीवरून खाली पडून गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर त्यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान, या अपघातात संजय पवार हेदेखील जखमी झाले असून, त्यांच्यावर कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मृत अशोक राणे यांचे पुत्र संकेत अशोक राणे (वय २७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संजय श्रीकांत पवार यांच्याविरुद्ध अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.