

चिपळूण: तालुक्यातील केतकी करंबवणे खाडीत बेकायदेशिर वाळू उत्खननावर महूसल विभागाने कारवाई केली. खाडीतील दोन सक्शन पंप या पथकाने जप्त केले आहेत. या खाडीत ड्रेझरला मान्यता असताना सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा केला जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या पथकाने ही कारवाई केली.
तालुक्यातील केतकी करंबवणे खाडीत वाळू उपशासाठी 2,3 महिन्यापुर्वीच डेझरला परवानगी देण्यात आली होती. या खाडीत हातपाटी आणि संक्शन पंपाने वाळू उपसा करण्यास बंदी आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून येथील खाडीत रात्रीच्यावेळी सक्शन पंपाच्या द्वारे वाळू उत्खननाचे प्रकार सुरू होते. या अनधिकृत व्यवसायाकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता.
बेकायदेशीर उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडविला जात असून अनधिकृत व्यावसायिकांचे उखळ पांढरे झाल्याची चर्चा देखील झाली. ज्या व्यवसायिकांनी लिलावाद्वारे वाळू उपसाची परवानगी घेतली, त्यांच्यावर अन्याय होत असल्याच्या तक्रारी झाल्या. अखेर अवैध वाळू उत्खननावर ओरड झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या पथकाने केतकी, करंबवणे खाडीत धाडी टाकल्या. या कारवाईत दोन ठिकाणी सक्शन पंप बेवारस स्थितीत आढळून आले. हे सक्शन पंप नेमके कोणाचे याचा अद्याप उलघडा झालेला नाही. सध्याच्या स्थितीला हे सक्शन पंप जप्त केले असून पुढील कारवाई महसूल विभागामार्फत सुरू आहे. अवैधरित्या वाळू उत्खननाचा प्रयत्न झाल्यास संबंधीतावर कारवाई केली जाते. कोणालाही पाठीशी घातले जात नसल्याचे तहसीलदार प्रविण लोकरे यानी सांगितले.