

चिपळूण : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय मार्गावर सातारानजीक सुरूर येथे झालेल्या भीषण अपघातात चिपळुणातील बाप-लेकीचा मृत्यू झाला. शनिवारी (ता. २१) सकाळी ही घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला असून आपल्या लेकीचा संसार पाहण्यासाठी पुणे येथे गेलेल्या बापावर काळाने घाला घातला असून या अपघातात बाप-लेक दोघे मृत्युमुखी पडले असून जावई, सासुबाई आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात मूळचे अनारी व सध्या खेर्डी देऊळवाडी येथे राहणारे विजय धोंडू पवार (वय ७०), तर त्यांची मुलगी वैष्णवी वैभव कदम (वय ४३, रा. वडेरू, सध्या रा. पुणे) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वैभव वामन कदम (वय ४५, मूळ रा. वडेरू, ता. चिपळूण, सध्या रा. पुणे) हे वर्षश्राद्ध निमित्ताने चिपळूणला जात होते.
वैभव हे आपल्या गाडीतून सासू व सासरे यांच्यासह पत्नी व मुलाला घेऊन गावी निघाले होते. सातारानजीक आले असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दुभाजकाला धडकली. कार तीन ते चार वेळा उलटली. यामध्ये सासरे विजय पवार व त्यांची मुलगी वैष्णवी कदम यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चालक असलेले वैभव कदम गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासह कारमधील सासुबाई वैशाली विजय पवार (वय ६२) व वेदांत वैभव कदम (वय १३) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिवाळीच्या सुट्टीसाठी आलेल्या आई वडिलांना परत गावी सोडून चिपळूण येथे वर्षश्राद्ध कार्यक्रमाला निघाले असता वाटेत ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. अपघातस्थळाचे दृश्य भयावह होते. रक्ताचा सडा पडला होता. या दुर्घटनेने परिसर भेदरून गेला. दरम्यान, भुईंज व वेळे या दरम्यान दररोज वाढणारे अपघात विचारात घेऊन जिल्हा पोलीस दलाने विशेष यंत्रणा उभी करावी अशी मागणी होत आहे.