Ratnagiri News : हापूस आला ‘शेकड्यावर’; दर गडगडले

चिपळूणात डझनाऐवजी थेट शेकडा दराने विक्री; लाखोंची उलाढाल
Hapus mango
हापूस आंबाPudhari News Network
Published on
Updated on

चिपळूण : चिपळूण शहरात अवकाळी पावसाच्या सावटाखाली हापूस आंब्याची विक्री आता डझनाऐवजी थेट शेकडा दराने केली जात आहे. चिपळूणमधील गुहागर नाका आणि भेंडीनाका परिसरात सध्या अडीच ते चार हजार रुपये शेकडा दराने हापूस आंब्याची विक्री होत असून, या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

तालुक्याच्या खाडीपट्टा व गुहागर भागातील आंबा मोठ्या प्रमाणावर येथे विक्रीसाठी येत असून, रत्नागिरीतील पावसाळी वातावरणामुळे आंबा बागायतदारांनी विक्रीसाठी हे नाके आपले मुख्य केंद्र बनवले आहे. सुट्टीच्या काळात गुहागरकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने परतीच्या प्रवासात हे पर्यटक आवर्जून थांबून आंब्याची खरेदी करत आहेत.

निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका यावर्षी हापूस उत्पादनाला बसला असून, संपूर्ण चिपळूण तालुक्यातील चार हजार हेक्टर क्षेत्रांपैकी केवळ दहा टक्के क्षेत्रांवरच यावर्षी उत्पादन मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात तब्बल तीस टक्क्यांनी घट झाल्यामुळे सुरुवातीला बाजारपेठेत हापूसच्या दरात मोठी वाढ झाली होती. गेल्या हंगामात पाचशे ते सातशे रुपये डझनाने मिळणारा आंबा यंदा थेट पंधराशे ते सतराशे रुपये डझनापर्यंत पोहोचला होता.

आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे दर कमी होतील, असे वाटत असतानाच उत्पादनातील घटीमुळे दरात वाढ झाली होती, मात्र आता हे दर हळूहळू कमी होऊ लागले आहेत. शहरातील मुंबई - गोवा महामार्ग दुतर्फा, पॉवर हाऊस, कामथे, बाजारपेठ, चिचनका, भेंडी नाका आदी भागांत आंब्यांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात असून, त्याला पर्यटक, चाकरमानी व स्थानिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news