

चिपळूण शहर : चिपळूण शहरातून जाणार्या मुुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत होणार्या उड्डाण पुलाची लांबी कापसाळ शासकीय विश्रामगृहापर्यंत नेण्याच्या मागणीसाठी शनिवारी चिपळुणातील महायुतीच्या घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला. यावेळी उपस्थितांनी या पुलामुळे आणि महामार्गावरील चुकीच्या व निकृष्ट कामांमुळे शहरासहीत नागरिकांना मोठा फटका बसत असल्याने शासनाकडे पुलाच्या कामासंदर्भात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरातून जाणार्या मुंबई-गोवा महामार्गावर बहादूरशेख ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाण पूल बांधण्यातआला आहे. मात्र हा पूल बहादूरशेख ते कापसाळ असा होणे गरजेचे होते. मात्र, प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाण पूल बांधण्यात येत आहे. शहरातील नगारिकांना अनेक त्रासदायक घटनांना सामोरे जावे लागत आहे. महामार्गाच्या या उड्डाणपुलाचे डिझाईन देखील चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. उड्डाण पुलाचे काम एखाद्या भिंतीसारखे असल्याने शहराचे विभाजन होणार आहे. एका बाजूला डोंगर भागात नागरी वस्ती आहे. तेथून नागरी वस्तीसह येणारे पावसाचे पाणी या पुलाच्या चुकीच्या व निकृष्ट कामामुळे पाण्याचा योग्य दिशेने निचरा होत नाही. त्याचबरोबर महामार्गानजिकच रुग्णालय, महाविद्यालय, शाळा, शासकीय कार्यालये असल्याने या ठिकाणी नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. उड्डाण पुलासह वळण मार्ग, जोड मार्ग आदी वर्दळीच्या भागात गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात झाले आहेत. त्यामध्ये काहींचा मृत्यू झाला तर काहीजण गंभीर जखमी आहेत. एकूणच महामार्गाचे काम आणि त्याचा दर्जा म्हणजे चिपळुणातील जनतेची फसवणूक करणारा असून चिपळूण शहरातून जाणारा महामार्ग हा मृत्यूचा सापळा झाला आहे.
एकूणच या सर्वाविरोधात व चिपळूण शहर भविष्यात सर्व द़ृष्टीने सुरक्षित राहावे, याकरिता महायुतीच्या बैठकीत उड्डाण पूल कापसाळपर्यंत नेण्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार समिती स्थापन करण्यासहीत आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय झाला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख उमेश सकपाळ, भाजपा शहर अध्यक्ष शशिकांत मोदी तर महाराष्ट्र युवती उपाध्यक्ष दिशा दाभोळकर, महिला जिल्हाध्यक्षा रश्मी गोखले, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन साडविलकर, युवा सेना अध्यक्ष निहार कोवळे, क्षेत्राध्यक्ष मनाली जाधव, शहराध्यक्ष, शहराध्यक्षा प्राजक्ता टकले, अदिती देशपांडे, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, माजी नगरसेवक विजय चितळे, मनोज जाधव, माजी नगरसेवक आदींसह घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.