Chinese shellfish: चायनिज शिंपले काढण्यासाठी भाट्ये किनारी खवय्यांची गर्दी

भाट्ये समुद्र किनार्‍यावर मागील 40 वर्षांमध्ये प्रथमच चायना शिंपल्यांचा मोठा समुद्री खजिना सापडला
Chinese clams Bhatye beach
रत्नागिरी : शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनारी शिंपले काढण्यासाठी जमलेली गर्दी. (छाया : केतन पिलणकर)
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनार्‍यावर मागील 40 वर्षांमध्ये प्रथमच चायना शिंपल्यांचा मोठा समुद्री खजिना सापडला आहे. हा खजिना लुटण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. नागरिक मिळेल ते साहित्य घेऊन भाट्ये किनारी धाव घेत आहेत. तिसर्‍या दिवशीही शिंपले काढण्यासाठी खवय्यांनी किनार्‍यावर मोठी गर्दी केली होती. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.

रत्नागिरी भाट्ये येथे तीन दिवसांपूर्वी एक मच्छीमार किनार्‍यावर जाळं टाकून मासे पागत असताना खाडी आणि समुद्राच्या मुखाजवळ मोठ्या प्रमाणात शिंपले दिसून आले. त्याने ते चांगले असल्याची खात्री करून होडीमधून मासे गरवणार्‍या आणखी तीन ते चार मच्छीमारांना दाखवले. त्यांनी ते गोळा करण्यास सुरुवात केली. यातील काहींनी याची माहिती राजिवडा परिसरातील मच्छीमार बांधवांना दिल्यानंतर अनेक जण त्याठिकाणी शिंपले काढण्यासाठी धावले. पहिल्या दिवशी काहीच लोक त्याठिकाणी उपस्थित होते. मात्र दुसर्‍या दिवशी भाट्ये किनारी शिंपले मिळत असल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरल्याने राजिवडा, भाट्ये, खडपेवठारसह आजूबाजूच्या गावातीलही शिंपले काढण्यासाठी धावले.

शिंपले काढणार्‍यांसोबतच बघ्यांची गर्दी इतकी वाढली की, भाट्ये पुलावरही वाहतुकीची मोठी कोंडी होऊ लागली आहे. शेवटी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

कोकणात या शिंपल्यांना मुळे किंवा शिंपले म्हणतात. प्रामुख्याने तिसरे आणि धामणे असे दोन प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळतात. कोकणातील मत्स्यप्रेमी खवय्ये तिसरे मुळे मोठ्या आवडीने खातात आणि त्यांना खवय्यांची मोठी पसंती असते. मात्र, सध्या भाट्ये किनार्‍यावर सापडत असलेली मुळ्यांचा प्रकार थोडी वेगळा आहे. याला चायना मुळे असे स्थानिकांनी नाव दिले आहे.

या चायना मुळ्यांचे घबाड भाट्ये किनार्‍यावर सापडल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या उत्साहात हे मुळे गोळा करत आहेत. ही दुर्मीळ घटना अनुभवण्यासाठी आणि या अनोख्या समुद्री खजिन्याचा लाभ घेण्यासाठी भाट्ये समुद्र किनार्‍यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे. मंगळवारी व बुधवारी तर भाट्ये समुद्र किनारा मुळ्ये गोळा करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनी अक्षरश: फुलून गेला होता.

अशी घ्यावी लागते काळजी

समुद्र किनार्‍यावर हे मुळे सापडत असल्याने यात वाळूही मोठ्या प्रमाणात असते. यांची साफसफाई करताना त्यात वाळू राहणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. वाळू राहिल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. वाळू मुळे किडनी स्टोनचाही त्रास भविष्यात होऊ शकतो, असे मत काही मच्छीमारांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news