खेड : पूर्वजांच्या पुण्याईमुळे मी सरन्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास करू शकलो. न्यायालयात काम करत असताना कित्येकदा अशी प्रकरणे समोर येतात, जी सोडवणे अवघड असते. माझी अशीच काहीशी स्थिती अयोध्या प्रकरणाचा निकाल देताना झाली होती. मी या खटल्याचा निकाल देण्यापूर्वी देवाकडेच मदत मागितली होती, असे प्रतिपादन सरन्यायाधीश डॉ. धनंचय चंद्रचूड यांनी रविवारी कनेरसर (ता. खेड) येथे केले.
डॉ. चंद्रचूड यांनी कनेरसर या त्यांच्या मूळ गावी पत्नी कल्पना दास यांच्यासह रविवारी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी गावाबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत माझी आई व यमाई देवीच्या कृपेने सरन्यायाधीश झाल्याचे सांगितले. डॉ. चंद्रचूड रविवारी सकाळी 11 वाजता गावात आले. त्यानंतर कनेरसर येथील पुरातन चंद्रचूड वाड्यास भेट देत त्यांनी ग्रामस्थांशी अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी श्री क्षेत्र यमाईदेवीचे दर्शन घेतले.
यावेळी चंद्रचूड मे महिन्याच्या सुट्टीतील वाड्याच्या व गावच्या आठवणींनी भावुक झाले. आमची आजी 1920 साली शिक्षणासाठी 9 मुले घेऊन पुण्यात आली. सर्व दागिने विकून त्यांनी मुलांना शिकवले. म्हणूनच माझे वडील यशवंतराव व मी सरन्यायाधीश झालो. आमच्या पूर्वजांच्या पुण्याईने हे झाले, हे सांगताना एका स्त्रीमुळे एवढे घडू शकते म्हणून स्त्री सशक्तीकरणाची भावना माझ्या मनात निर्माण झाली. यामुळे महिलांबाबत अनेक निर्णय घेतले. एवढेच नव्हे, तर दोन मुलींनाही दत्तक घेतले, असे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी गावकर्यांचे आभार मानले.