रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार मच्छीमार नौकासुद्धा बुधवारी मासेमारीसाठी समुद्रात गेल्या नाहीत. त्यामुळे मासळी मार्केटमध्ये मच्छीचे दर वधारलेले होते. परिणामी खवय्यांनी मासळीऐवजी चिकन, मटणला पसंती दिली.
मतदानाच्या दिवशी इतर आस्थापनांसह मच्छीमार नौका बंद ठेवण्याचे निर्देश होते. त्यामुळे मासळी मार्केटमध्ये मच्छी व्यवसाय करणार्या महिलांनी मंगळवारी मिरकरवाडा बंदरावर जाऊन मासळी खरेदी करून ठेवली. बुधवारी मासळी मिळणार नसल्याने मंगळवारी मासळीचे दर वाढले होते. त्याचबरोबर बुधवारी मासळी विकताना प्रशासनाने ही विक्री बंद करण्यास सांगितले तर नुकसान होऊ नये म्हणून मंगळवारी फारच कमी प्रमाणात महिला वर्गाने मासळी खरेदी केली होती.
मच्छी मार्केटमध्ये त्यामुळे बुधवारी मासळी फारच कमी होती. त्याचबरोबर असलेली मच्छी चढ्या दराने घेतली असल्याने ती त्याच प्रमाणात वाढीव दराने विकावी लागत होती. ग्राहकाला हे दर परवडणारे नसल्याने बहुसंख्य ग्राहकांचे पाय चिकन आणि मटण दुकानांकडे वळले.