

Mumbai Goa road fire incident
राजापूर: मुंबई-गोवा महामार्गावर आज (शनिवार, दि. १९ जुलै) सकाळी एका धावत्या केमिकल टँकरला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. राजापूर तालुक्यातील पन्हाळे-माळवाडी येथे सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याहून मुंबईच्या दिशेने केमिकल घेऊन जाणारा टँकर पन्हाळे-माळवाडीजवळ आला असता, त्याच्या चाकांनी अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले. ही घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तातडीने थांबवून ती एकेरी मार्गावरून वळवली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली असली तरी पुढील अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस आणि नगर परिषदेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित मदतकार्य सुरू करत आगीवर नियंत्रण मिळवले. या कामगिरीमुळे टँकरमधील केमिकलने पेट घेण्याचा धोका टळला.
या आगीत टँकरचे मोठे नुकसान झाले असले तरी, नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र आता ती पूर्ववत झाली आहे. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.