

मुंबई ः अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक सोमवारी दोन दिवसांसाठी राज्यात येणार असून, ते पूर आणि अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेणार आहे. या पथकाच्या अहवालानंतर केंद्र सरकारकडून राज्याला द्यायच्या मदतीची रक्कम निश्चित केली जाईल. त्यामुळे या पथकाचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयातील सहसचिव विशाल पांडेय यांच्या नेतृत्वाखालील सात अधिकार्यांच्या पथकात कृषी विभागाचे संचालक व कापूस विकास मंडळाचे डॉ. ए. एल. वाघमारे, जलशक्ती मंत्रालयाचे कंद्रप व्ही. पटेल, सत्येंद्र प्रताप सिंग, अभिषेक कुमार करण सरीन, डॉ. एस. व्ही. एस. पी. शर्मा यांचा समावेश आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितल्यानंतर नुकसानीचे स्वरूप जाणून घेण्यासाठी हे अधिकारी येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मराठवाड्याला यावर्षी झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका बसला. याखेरीज राज्याच्या अन्य भागातही पावसाने दाणादाण उडवली. अतिवृष्टीमुळे नद्यांचे प्रवाह बदलले. अनेक गावे पाण्याखाली गेली. हजारो एकरवरील जमीन खरवडून गेली. त्यामुळे शेतकरी हैराण झाला. या शेतकर्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने 31 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असले तरी त्यातील काही रक्कम केंद्र सरकारकडून मिळणार आहे. ही मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. किती घरांचे नुकसान झाले, किती विहिरी गाळाने भरल्या, किती शाळांचे व आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नुकसान झाले, वीज वितरणाचे पायाभूत नुकसान झाले याचा तपशील राज्य सरकारकडे संबंधित जिल्हा अधिकार्यांनी यापूर्वीच सादर केला आहे. आता नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय अधिकार्यांचे हे पथक महाराष्ट्रात येणार आहे.