

रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी कोकजेवठार येथे रविवार 19 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वा. सुमारास नॅनो कारने अचानकपणे पेट घेतला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून कार पूर्ण जळाल्याने 25 हजार रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत विश्वनाथ गंगाराम पवार (74,रा.हुनमाननगर विलेपार्ले,मुंबई) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, रविवारी विश्वनाथ हे पत्नी वंदना पवार आणि आपल्या चालकासह नॅनो कार (एमएच-02-व्हीटी-4633) मधून मुंबई ते ओणी असा प्रवास करत होते. दुपारी 12.30 वा. सुमारास ते निवळी कोकजेवठार येथे आले असता, त्यांच्या कारमधून अचानकपणे धूर येवू लागला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने पवार दाम्पत्याला कारमधून बाहेर काढल्यानंतर कारने पेट घेतला.
ही बाब आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामीण पोलिस, अग्निशमन दल आणि हातखंबा वाहतूक पोलिसांना पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने नॅनो कार रस्त्याच्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल रुपेश भिसे करत आहेत.