

रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील धनावडेवाडी बंधाऱ्यात १६ वर्षीय मुलाचा बूडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे गयाळवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सार्थक सुहास गुरव (मूळ रा.लांजा, सध्या गयाळवाडी, रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. सार्थक हा सकाळी गयाळवाडी परिसरातील मित्रांसह पोहण्यासाठी कारवांचीवाडीतील धनावडेवाडी बंधाऱ्यात गेला होता. मित्रांसह पोहताना सार्थकला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊन बुडू लागला. ही बाब त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली. त्यांनी सार्थकला पाण्यातून बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु सार्थकचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.