

मालवण : मालवण किनार्याजवळ समुद्रात मासेमारीसाठी गेलेली ‘संगम’ नावाची बिगरयांत्रिक नौका मंगळवारी सकाळी सोसाट्याच्या वार्यामुळे उलटून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत जितेश वाघ (रा. मेढा-जोशीवाडा) हा तरुण मच्छीमार बेपत्ता झाला. जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कीर्तिदा तारी हे आपली ‘संगम’ नौका घेऊन सचिन केळूसकर आणि जितेश वाघ या दोन खलाशांसह मंगळवारी पहाटे 6 वाजता मालवण किल्ल्यासमोरील समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. सकाळी सव्वासहाच्या सुमारास समुद्रात जाळी टाकत असताना अचानक हवामानात बदल झाला. सोसाट्याचा वारा सुटल्याने समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या. एका जोरदार लाटेचा तडाखा बसल्याने त्यांची नौका समुद्रात उलटली आणि तिघेही जण पाण्यात फेकले गेले. या दुर्घटनेनंतर कीर्तिदा तारी आणि सचिन केळूसकर यांनी नौकेला धरून ती सरळ करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जितेश वाघ त्यांच्यापासून सुमारे 15 ते 20 फूट अंतरावर पोहत होता. मात्र, काही क्षणातच तो नजरेआड झाला. घाबरलेल्या तारी आणि केळूसकर यांनी नौका सरळ करून जितेशचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यांनी तत्काळ किनार्यावर येऊन स्थानिक मच्छिमारांना या घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने सूत्रे हलवली. मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकाला पाचारण करण्यात आले असून, त्यांनी अत्याधुनिक साधनांसह शोधमोहीम सुरू केली आहे. स्थानिक मच्छीमारही आपल्या नौका घेऊन स्वयंप्रेरणेने शोधकार्यात सहभागी झाले आहेत.तंत्रज्ञानाचा वापर: बेपत्ता मच्छिमाराचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेर्यांचा वापर केला जात आहे. तसेच, ’इन्कॉईस’च्या ’सर्च अँड रेस्क्यू टूल’ प्रणालीद्वारे समुद्राचा प्रवाह आणि वार्याची दिशा लक्षात घेऊन जितेश कोणत्या दिशेने वाहून गेला असेल, याचा नकाशा तयार करण्यात आला आहे. त्या विशिष्ट भागात शोधकार्य केंद्रित करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांकडून दखल: पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय मंत्री नीतेश राणे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी प्रशासनाला शोधकार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले असून, बेपत्ता जितेश वाघ यांच्या कुटुंबीयांना शासकीय योजनेतून तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
केंद्र शासनाच्या नियमानुसार 1 जून ते 31 ऑगस्ट हा मासेमारी बंदीचा कालावधी आहे. या कालावधीत समुद्रातील मासेमारी पूर्णतः बंद असते. तरीही ही मासेमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी कशी गेली? हा सवाल आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला असतो. यामुळे अपघाताचा धोका असतो. त्याचबरोबर हा हंगाम माशांच्या प्रजननाचा असल्याने या काळात मासेमारी केल्यास मासळीच्या पिल्लांचाही नाश होण्याचा धोका असतो. यासाठी शासनाने हा मासेमारी बंदी कालावधी लागू केला आहे. तरीही बंदी मोडून अनेकजण जीव धोक्यात घालून समुद्रात मासेमारीसाठी जातात. यावर मत्स्य व्यवसाय विभागाने नियंत्रण आणणे आवश्यक आहे.