Ratnagiri News : महायुतीचा उमेदवार आयात की इच्छुकांमधून?

नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी खलबते; मुंबईमध्ये तातडीची बैठक
Ratnagiri Election
महायुतीचा उमेदवार आयात की इच्छुकांमधून?
Published on
Updated on

चिपळूण : महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी जोरदार हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने थेट मुंबईमध्ये बैठक आयोजित केली आहे. चिपळुणातील काही प्रमुख कार्यकर्त्यांना तातडीने बैठकीचे निमंत्रण आले आहे. अनेकजण मुंबईमध्ये रवाना झाले आहेत.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या जिल्हा दौर्‍यानंतर या प्रक्रियेला अधिकच वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा दोन्ही बाजूनी निर्णय झाला आहे. मात्र, प्रत्येकाचे उमेदवार कोण असणार? यावरच मोठी खलबते सुरू आहेत.

नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वारे जोरात वाहू लागले आहेत. महायुतीच्या माध्यमातून घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीनही पक्षांनी आपले उमेदवार तयार केले होते. राष्ट्रवादीकडून मिलिंद कापडी, शिवसेनेकडून उमेश सकपाळ, सुधीर शिंदे यांचे नाव पुढे आले होते तर भाजपकडून सहा नावे पुढे येत होती. यामध्ये मंगेश तांबे व विजय चितळे यांचे नाव चर्चिले जात आहे. मात्र, आता महायुतीचा निर्णय झाल्यानंतर तिनही पक्षांच्या इच्छुकांमधून उमेदवारीची लॉटरी कोणाला लागते हे महत्त्वाचे आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून त्यांचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने रमेश कदम यांच्या नावाला पसंती दिली आहे. मात्र, कदम हे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कशी कुठून मिळवतात या बाबत शहरात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. दुसर्‍या बाजूला काँग्रेसकडून लियाकत शाह यांनी नगराध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे तर ठाकरे शिवसेनेकडून बाळा कदम यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हे अद्याप देखील निश्चित झालेले नाही. महायुतीच्या उमेदवाराच्या निश्चितीनंतरच महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत हे चिपळुणात त्या बाबत चाचपणी करत आहेत.

दरम्यान, भाजपनेही नगराध्यक्ष पदावर आपला दावा ठोकला आहे. त्यामुळे चिपळूण नगराध्यक्ष पदासाठी भाजपा तसेच शिंदे सेना यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. विद्यमान उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांना चिपळूणमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपल्याच पक्षाचा हवा यासाठी ते देखील प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महायुतीत एकमत झाल्यास उमेदवार कोण? हे प्रश्नचिन्ह आहे. इच्छुकांमधून महायुती उमेदवार देणार की नव्याने आयात होणार या बाबत शहरात मात्र चर्चा रंगू लागल्या आहेत.

इच्छुकांच्या मुलाखती

नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळुणात गुरुवार (दि. 6) शिवसेनेच्या वतीने शहरातील पुष्कर हॉल येथे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी इच्छुक असणारे उमेदवार उपस्थित होते. शिवसेना उपनेते व माजी आ. सदानंद चव्हाण व पक्ष पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या. त्याच पद्धतीने ठाकरे शिवसेनामधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने इच्छुकांचे अर्ज 10 नोव्हेंबरपर्यंत मागविले आहेत. त्यामुळे आता राजकारण हळूहळू रंगू लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news