

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात 29 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून येणाऱ्या ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने हा ट्रक कंटेनरवर आदळला. या अपघातात ट्रक चालक फैजाक जाकीर पिया (24, रा. गुजरात) वाहनात अडकून गंभीर जखमी झाला.
या अपघाताच्यावेळी रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे हे रत्नागिरीकडे जात होते. त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने थांबून घटनास्थळी पोहोचलेल्या वाहतूक पोलिस व आपल्या सहकाऱ्यांसह बचावकार्य सुरू केले. पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने जखमी चालकाला वाहनातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमी चालकास नरेंद्र महाराज संस्थेच्या रुग्णवाहिकेतून सूरज हंबीर यांनी तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिस अधीक्षक व त्यांच्या पथकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुंबई- गोवा महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे गोव्याहून मुंबईच्या दिशेला वाहतूक बाधित झाली. यावेळी वाहतूक पोलिस कर्मचारी, खेडचे पोलिस निरीक्षक विवेक अहिर व सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.