

रत्नागिरी : रत्नागिरी शहराचा पर्यटनद़ृष्ट्या विकास व्हावा म्हणून पालकमंत्री उदय सामंत नवनवीन उपक्रम सातत्याने राबवत असून शहराचा चेहरामोहरा त्यामुळे बदलत आहे. शहराबरोबरच किनारपट्टी भागाच्या विकासावरही त्यांनी लक्ष दिले असून, पर्यटन स्थळ म्हणून भाट्ये किनार्याचाही विकास होत आहे. याच ठिकाणी भाट्ये पूल ते झरी विनायक मंदिर दरम्यान पर्यटनाच्या दृष्टीने रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार असून वॉकिंग ट्रॅकही उभारला जाणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यात अनेक धार्मिक व निसर्ग सौंदर्याने नटलेली स्थळे आहेत. तीनही ऋतुमध्ये सह्याद्रीच्या टोकापासून अरबी समुद्रापर्यंत जिल्हा पर्यटकांना साद घालत असतो. येथील खाड्यांमधील निसर्ग सौदर्यतर अप्रतिम असे आहे. गोव्यापेक्षाही सुंदर स्थळे रत्नागिरी जिल्ह्यात असल्याने, त्यांचा विकास व्हावा यासाठी पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. रत्नागिरी मतदार संघातील गणपतीपुळेच्या विकासासाठी विकास आराखडा, निवेंडी येथे होऊ घातलेले प्राणी संग्रहालय, बोटींग प्रकल्प, रत्नागिरी शहरातील शिवसृष्टी, छत्रपती संभाजी राजेंचा पुतळा, श्री विठ्ठल मूर्ती, थ्रीडी मल्टीमीडिया सारख्या विविध उपक्रमांचा समावेश आहे. मागील तीनचार वर्षात रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे अनेक उपक्रम पूर्ण झाले आहेत. काहींची कामे वेगाने सुरू आहेत.
रत्नागिरी शहराला लागून असलेल्या भाट्ये गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील लढवय्या सेनानी मायाजी भाटकर यांची समाधी आहे. याच गावाला एका बाजुला समुद्रकिनारा तर एका बाजूला खाडीने वेढलेले असून या गावच्या सौंदर्यात भर टाकत आहे. समुद्रकिनार्यावरील झरी विनायक मंदिरही भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. या किनार्यावर काही लाख रुपये खर्च करुन, पर्यटनद़ृष्ट्या विकास केला जात आहे. पार्किंग व्यवस्था, समुद्र स्थान केलेल्या पर्यटकांना कपडे बदलण्यासाठी सुविधा, किनार्यावर विजेची सुविधा उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याच गावात नारळ संशोधन केंद्र असून याठिकाणीही अनेक पर्यटक, अभ्यास, शेतकरी माहिती घेण्यासाठी व भेट देण्यासाठी सातत्याने येत असतात. भाट्ये गावातूनच पावसकडे जाणारा मार्ग असून अगदी सिंधुदुर्ग, राजापूरला जाणार्या पर्यटक व प्रवाशांची संख्याही मोठी आहे. या रस्त्याला मागील काही वर्षात मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाट्ये किनार्याच्या विकासाच्या द़ृष्टीने भाट्ये पूल ते झरी विनायक मंदिर दरम्यान, जवळपास दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. या रस्त्याला लागूनच सुरुबनाच्या बाजूने वॉकिंग ट्रॅकही उभारला जाणार आहे. यासाठी सात ते आठ कोटींचा खर्च अपेक्षित असून, याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. रस्ता रुंदीकरणाबरोबरच दोन्ही बाजूने व दोन रस्त्याच्या मध्ये डिव्हायडरमध्ये झाडे लावून त्याचे सुशोभीकरण केले जाणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. चौपदरीकरण झालेला हा रस्ता भाट्ये गावच्या सौंदर्यात भर घालणार आहे.
भाट्ये गावाला सुंदर समुद्र किनार्यसह भाट्ये गावामध्ये नारळ संशोधन केंद्रासोबतच राज्य शासनाचे विभागीय कृषी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे सागरी संशोधन केेेंद्र, एनसीसीच्या विविध अॅक्टिव्हिटिजही किनार्यावर होत असतात. भाट्ये खाडीमध्ये बोट हाऊस प्रकल्पही लवकरच सुरू करण्याचा मानस पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.