चिपळूण : चिपळुणच्या राजकारणात सहभाग घेत नाही. सिंधुदुर्ग ते चिपळूणपर्यंत माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर जबाबदारी आहे. एबी फॉर्मही माझ्याकडे आलेले नाहीत. मात्र, महाविकास आघाडी म्हणून चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत कोणताच निर्णय होत नव्हता. पक्षाचे काही पदाधिकारी आणि त्यानंतर माजी आमदार रमेश कदम आपल्याकडे आले आणि लक्ष घालण्याची विनंती केली.
आपण शिवसेना नेता म्हणून त्यात लक्ष घातले आता महाविकास आघाडी म्हणूनच उमेदवारांचा प्रचार करणार जेथे आम्ही उमेदवार दिले नाहीत तेथे जाणार नाही, असे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे आता आमदार जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांची आघाडी झाल्याचे स्पष्ट झाले.
शनिवारी आ. जाधव यांच्या संपर्क कार्यालयात दुपारी पत्रकार परिषद झाली यावेळी आघाडीचे उमेदवार रमेश कदम देखील उपस्थित होते. आ. जाधव पुढे म्हणाले, नगराध्यक्षपदासाठी चर्चेअंती रमेश कदम यांचे नाव निश्चित झाले. आमच्या पक्षाकडून देखील नगराध्यक्षपदी लढवण्यास कोणी तयार नव्हते.
त्याआधी आमची काँग्रेस बरोबर बोलणी सुरू होती. कदम यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनुसार जागाही ठरल्या. त्यानंतर ही चर्चा अर्धवट राहिली. उमेदवारी अर्ज भरण्यापर्यत वेळ आली तरी आपल्या पक्षातील लोक दूर राहिले, अखेर कदम यांनी आपण काही जागा वाटून घेतल्या. त्यामुळे आमची आघाडी आहे, असे आ. जाधव म्हणाले.
निमित्ताने घडणार्या राजकारणाबाबत आमदार जाधव म्हणाले, काही कार्यक्रमांच्या निमित्ताने रमेश कदम व आपली भेट होत गेली. लोकसभा व विधानसभेला आम्ही एकत्रीत प्रचार केला. आता आमच्या वरिष्ठांनी आघाडी किंवा स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. त्या आदेशानुसार आम्ही काम करत आहोत.
महायुतीतील घटक पक्ष असणार्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला लावले आहे. आमदार शेखर निकम यांनी जरी आम्हाला पाठिंबा दिला तरी तो आम्ही घेऊ, असे आमदार जाधव यांनी सांगितले.