

Bhaskar Jadhav on Brahmin Samaj
राजन चव्हाण, पुढारी न्यूज
रत्नागिरी : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या एका व्हॉट्सॲप स्टेटसमुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार पेशव्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी करून बुडवले, असा दावा करणारा साने गुरुजी यांच्या चित्रपटातील एक व्हिडिओ त्यांनी स्टेटसवर ठेवत थेट ब्राह्मण समाजाला डिवचल्याची चर्चा सुरू झाली आहे. या स्टेटसमुळे एका नव्या आणि तीव्र वादाला फोडणी मिळाली आहे.
आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर साने गुरुजी यांच्या चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाळकरी वयातील साने गुरुजी अत्यंत प्रभावीपणे वर्गातील शिक्षकांसमोर मुद्दे मांडताना दिसत आहेत. यावेळी ते म्हणतात, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या दूरदृष्टीने उभारलेले आणि कान्होजी आंग्रे यांनी जिवापाड सांभाळलेले मराठा आरमार पेशव्यांनी इंग्रजांशी संगनमत करून समुद्रात बुडवले. पेशव्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी परकीय शक्ती असलेल्या इंग्रजांशी हातमिळवणी करून स्वराज्याच्या नौदलाचा घात केला,’’ असे सांगताना ते इतिहासाचा दाखला देतात. साने गुरुजींच्या मते, ही इतिहासातील एक मोठी चूक होती, ज्यामुळे भारताच्या सागरी सार्वभौमत्वाला मोठा धक्का बसला.
भास्कर जाधव यांनी हा व्हिडिओ स्टेटसवर ठेवला असून काही ग्रुप्समध्येही त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
भास्कर जाधव यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पहा:
भास्कर जाधव काय म्हणाले होते?
मी या तालुक्यात आल्यानंतर गुहागरला वैभव आले. इकडची खोतकी मी संपवली, लेखणीचा दहशतवाद मी संपवलाय. पत्रव्यवहार करून लोकांना छळलं जायचं. ते मी बंद केलं, असं विधान भास्कर जाधव यांनी केलं होतं.
ब्राह्मण सहाय्यक संघाचं म्हणणं काय?
भास्कर जाधव हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्यातील ऐक्याला बाधा आणत असल्याचा ब्राह्मण सहाय्यक संघाचा जाधव यांच्यावर आरोप आहे. राजकीय प्रवासात जाधवांनी ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे आणि ओट्या झिजवल्याची आठवणही संघाने जाधव यांना पत्राद्वारे करून दिली होती.
भास्कर जाधवांनी काय प्रत्युत्तर दिले होते?
मी कोणाची माफी मागावी आणि कशासाठी.. मी काय केलं? मी समाजचं नाव घेतलेलं नाही...समाजाविषयी काहीही बोललेलं नाही, माझा रोख हा गुहागरमधील ब्राम्हण समाजावर होता, असं भास्कर जाधवांनी मंगळवारी म्हटले होते. समाजात द्वेष पसरवण्याचे काम ब्राह्मण सहाय्यक संघ करत असून राजकीय वादात ब्राह्मण समाजाने पत्र द्यायची काय गरज? निलेश राणे यांनी माझ्या कुटुंबातील महिलांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. तेव्हा विनय नातू टाळ्या वाजवत होते. त्यावेळी ब्राह्मण समाजाने निषेध व्यक्त का केला नाही, असा सवालही त्यांनी विचारला होता.