रत्नागिरी : राज्यात जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला १ हजार ५०० रुपये जमा करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात या योजनेचा ४ लाख १८ हजार ८२४ महिलांनी लाभ घेतला आहे. यासाठी ६१ कोटी ५४ लाख २३ हजार रुपये एका महिन्याला जिल्ह्यात आले आहेत. अजूनही २ हजार ६५३ महिला या योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. अल्पावधित सर्वांत जास्त प्रसिद्ध झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे जिल्ह्यातील ४ लाख १८ हजार ८२४ लाभार्थी बहिणी आहेत. त्यांना एका महिन्यात ६१ कोटी ५४ लाख २३००० रुपयाचे वितरण करण्यात आले आहे, तर काही त्रुटीमुळे २ हजार ६५३ अर्ज प्रलंबित आहेत.
विधानसभा आचारसंहिता लागू झाल्यामुळे सध्या या योजनेचा निधी वितरित करण्यात येऊ नये, असे आदेश महिला व बालकल्याण विभागाला प्राप्त झाले आहेत; परंतु आचारसंहितेपूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते खात्यात जमा झाल्यामुळे लाडक्या बहिणीला चिंता नाही. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीने धाडसी निर्णयांपैकी एक सर्वांत मोठा आणि वेगळा निर्णय घेतला तो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. महिन्याला या योजनेच्या लाभार्थ्यांला १५०० रुपये खात्यात जमा होणार.
त्यासाठी पोर्टलवर आणि प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात अर्ज येण्यास सुरुवात झाली. या योजनेच्या प्रसिद्धी आणि प्रचारासाठी जिल्ह्यातील मोठमोठे कार्यक्रम घेण्यात आले. पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रमोद महाजन क्रीडासंकुलावर शासनाचा दणक्यात कार्यक्रम घेतला. सुमारे चाळीस ते पन्नास हजार जिल्ह्यातील महिला उपस्थित होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला आले होते. त्यानंतर तालुका स्तरावर लाडकी बहीण योजनेचे विविध कार्यक्रम झाले.
महिलांनी मोठ्या प्रमाणात या योजनेला प्रतिसाद दिला. पोर्टलसह थेट अर्जदेखील मिळून ४ लाख २३ हजार महिलांनी अर्ज केले. त्यांची छाननी होऊन जिल्ह्यातील ४ लाख १८ लाभ ८२४ महिलांचे अर्ज मंजूर झाले. त्यांच्या खात्यात महिन्याला १५०० ते ३ हजार जमा होण्यास सुरुवात झाली. हे पैसे काढण्यासाठी महिलांची विविध बँकांमध्ये मोठी गर्दी होऊ लागली. शासनाने आचारसंहितेत योजना अडकण्यापूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला. योजना कधीही बंद पाडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यासंह शासनकर्त्यांनी दिली. आचारसंहिता लागण्यापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या २ महिन्याचे ३ हजार रुपये लाभार्थी बहिणींच्या खात्यात जमा झाले.