

रत्नागिरी : बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती कार्यालय आणि बालरंगभूमी परिषद, शाखा रत्नागिरी यांचे आयोजनातून इतिहास महाराष्ट्राचा या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाचे महत्त्व अधोरेखित व्हावे, ऐतिहासिक जडण घडण व्हावी आणि नाट्य, नृत्य, गायन या कलांद्वारे आपला गौरवशाली इतिहास सादर व्हावा या उदात्त हेतूने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
वय वर्षे 5 ते 15 वयोगटातील मुले, मुली यात सहभागी होऊ शकतात. सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे. ही स्पर्धा एकल आणि समूह या दोन गटांमध्ये होणार आहे. एकल गटात वय वर्षे 5 ते 10 असा एक विभाग असून छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर विद्यार्थ्यांना सादरीकरण करायचे आहे. तर एकल गटात वय वर्षे 11 ते 15 असा दुसरा विभाग असून या विभागासाठी आणि समूह गटासाठी छत्रपती शिवाजी महाराज जन्म ते राज्याभिषेक असा विषय देण्यात आलेला आहे. एकल गटासाठी 5 मिनिटे आणि समूह गटासाठी 10 मिनिटे असा सादरीकरण कालावधी देण्यात आलेला आहे. नाट्य, नृत्य, गायन यांचा संगम करून सादरीकरण अपेक्षित आहे. समूह गटात कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 10 विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेची प्राथमिक फेरी 12 ऑगस्ट 2025 रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण आणि दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी दैवेज्ञ भवन, नाचणे रोड, रत्नागिरी येथे होणार आहे.
प्राथमिक फेरीतून प्राविण्य मिळवलेले प्रत्येक गटातील आणि विभागातील प्रथम 2 स्पर्धक/ संघ अंतिम फेरीकरीता पात्र होतील. अंतिम फेरी 23 आणि 24 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. अंतिम फेरीत विजेत्या स्पर्धक विद्यार्थी आणि संघांना रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्रक आणि पुस्तके देऊन सन्मानित करण्यात येईल. तर प्राथमिक आणि अंतिम स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद, शाखा रत्नागिरी तर्फे करण्यात आले आहे. नंदकिशोर जुवेकर, सीमा कदम, शौकत गोलंदाज यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती कार्यालय व बालरंगभूमी परिषद, शाखा शाखेतर्फे करण्यात आले आहे.