Ayushman Bharat Yojana| आयुष्यमान योजना गोरगरिबांसाठी ठरतेय वरदान
जाकीरहुसेन पिरजादे
रत्नागिरी : आर्थिंकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून आयुष्मान भारत प्राधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरूवात करण्यात आली. मागील सात वर्षांपासून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील 18 हजारहुन अधिक गोरगरिबांनी या योजनेचा लाभ घेवून उपचार करून घेतले. त्यामुळे ही योजना आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या गोरगरीब रूग्णांची आधार बनली आहे. त्यामुळे या योजनेची आणखीन जनजागृती होणे गरजेची असून जनजागृती झाल्यास गावे, खेड्यापाड्यातील, दुर्गम भागातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल.
आयुष्यमान भारत योजना ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड प्रदान करते. या योजनेअंतर्गत कार्डद्वारे आर्थिकदृष्टया दुर्बल नागरिक रूग्णालयात जावून 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळत आहे. ही योजना 2018 सालापासून सुरूवात झाली. देशभरातून कोट्यवधी गरीब, गरजू रूग्णांनी या योजनेचा लाभ घेतला तर रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो, लाखो रूग्णांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेवून उपचार घेतले.पूर्वी उपचाराची मर्यादा होती, त्याचबरोबर विमाकवच कमी होते. आता हद्रय, मेंदू, किडनीसह अन्य आजारावर उपचार, शस्त्रक्रिया या योजनेतून होत आहे. त्यामुळे खासगी रूग्णालयात होणारा लाखोंचा खर्च गरिब रूग्णांचा वाचला आहे. आयुष्यमान भारत, आयुष्यमान वय वंदना कार्ड बनविण्यासाठी आधार कार्ड, आधारशी जोडलेला मोबाईल नंबर हे आवश्यक आहे. तक्रार असल्यास टोल फ्री, वेबसाईटवर तक्रार निवारण होईल. त्यामुळे जास्तीत जास्त आर्थिक दुर्बल घटकातील रूग्णांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे तसेच मोठ्या प्रमाणात या योजनेची जनजागृती होणे गरजेची आहे. या योजनेतून 1,356 आजाराचे उपचार होतात. यात हद्रयविकार, कर्करोग, मूत्रपिंड विकार, मधुमेह, बालरोग, नेत्ररोग,जठर, आतड्याचे विकार, स्त्रीरोग शस्त्रक्रियासह विविध आजारांचा समावेश आहे.

