Ratnagiri News : रानवेलींच्या कुशीत दडला चालुक्यकालीन राजवाडा!

संगमेश्वरच्या धामापुरात प्राचीन मंदिराचे भग्नावशेष
Ratnagiri News
रानवेलींच्या कुशीत दडला चालुक्यकालीन राजवाडा!
Published on: 
Updated on: 

संगमेश्वर : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोकणच्या ऐतिहासिक वैभवाचे अनेक ठेवे आजही काळाच्या पडद्याआड आहेत. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर (पूर्वीचे धर्मपूर) येथे रानवेली, झाडाझुडपांच्या विळख्यात दडलेले प्राचीन राजवाड्याचे भग्नावशेष आणि मंदिराचे अवशेष समोर आले आहेत. गर्भगृहातील देखणी मात्र भग्न मूर्ती, प्राचीन बांधकामाचे अवशेष आणि शिमगोत्सवाशी जोडलेली राजघराण्याची परंपरा या परिसराच्या ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देतात. चालुक्य ते शिलाहारकालीन इतिहासाशी नाते सांगणाऱ्या या वास्तूंचे शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण, उत्खनन आणि संवर्धन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

चालुक्य ते शिलाहारकालीन इतिहासाचे संदर्भ

प्राचीन अपरांत भूमीतील संगमेश्वर हे धार्मिक आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र होते. सातव्या शतकातील चालुक्य राजवटीचा या परिसरावर प्रभाव असल्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत. राजा कर्ण याच्याशी कर्णेश्वर मंदिराची परंपरा जोडली जाते. या पार्श्वभूमीवर धामापूरमधील वास्तूंचे अवशेष ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहेत. या ठिकाणाचा नेमका कालखंड आणि राजवटीशी असलेला संबंध निश्चित करण्यासाठी पुरातत्त्वीय संशोधनाची आवश्यकता आहे.

भग्नावस्थेतही मूर्तीचे देखणे शिल्पसौंदर्य

धामापूरमधील ओढ्याच्या काठावर चिरे आणि विटांनी बांधलेल्या या वास्तूंचे अवशेष विखुरलेले आहेत. मंदिराचे बाह्य बांधकाम मोठ्या प्रमाणात ढासळले असले, तरी गर्भगृह आजही अस्तित्वात आहे. त्यामध्ये उभी असलेली प्राचीन मूर्ती विशेष लक्ष वेधून घेते. मूर्तीच्या मस्तकावर उंच किरीट, कमरेला कंबरपट्टा आणि मांड्यांपर्यंत कोरलेले वस्त्र यांमधून तत्कालीन शिल्पकलेचा प्रत्यय येतो. मूर्तीचे दोन्ही पाय गुडघ्याखाली भग्न झाले असले, तरी तिचे शिल्पसौंदर्य कायम आहे. मूर्तीमागील कमानदार चौकट, मुकुटाची रचना आणि चौकोनी पीठ यांचा विचार करता या शिल्पाचा काळ साधारणतः ११ व्या ते १३ व्या शतकातील शिलाहार ते उत्तर यादव कालखंडातील असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याची अधिकृत ऐतिहासिक ओळख निश्चित होण्यासाठी तज्ज्ञांचा अभ्यास आवश्यक आहे.

पुरातत्त्व विभागाच्या संशोधनाची प्रतीक्षा

निसर्गाच्या हिरव्यागार आवरणात लपलेला हा ऐतिहासिक ठेवा योग्य देखभालीअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वास्तूंचे अवशेष, मंदिरातील मूर्ती आणि स्थानिक लोकपरंपरा यांचा एकत्रित अभ्यास झाल्यास संगमेश्वरच्या प्राचीन इतिहासावर नवा प्रकाश पडू शकतो. पुरातत्त्व विभागाने या परिसराची पाहणी करून शास्त्रीय सर्वेक्षण, आवश्यक उत्खनन आणि संवर्धनाची कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. धामापूरचा हा विस्मृतीत गेलेला वारसा जतन झाल्यास कोकणच्या ऐतिहासिक पर्यटनालाही नवी दिशा मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.